सर्पमित्र नव्हे, सर्पमैत्रीण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:06 AM2021-03-08T04:06:04+5:302021-03-08T04:06:04+5:30
महिलांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कर्तव्य बजावण्याचा जमाना सरला, आता महिला पुरुषांच्या काही पावले पुढे जाऊन प्रत्येक क्षेत्रात आपला ...
महिलांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कर्तव्य बजावण्याचा जमाना सरला, आता महिला पुरुषांच्या काही पावले पुढे जाऊन प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवीत आहेत. स्त्री म्हणजे सोशिकतेची मूर्ती, हा डाग पुसून आपल्या कौशल्याच्या बळावर जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता त्यांनी सिद्ध केली आहे. त्यापैकी काही प्रसिद्धीच्या प्रवाहात आल्या, तर काही त्यापासून दूर राहिल्या. अशाच काही अपरिचित महिलांच्या कार्यकर्तृत्त्वाला उजाळा देण्याचा प्रयत्न...
* सर्पमित्र नव्हे, सर्पमैत्रीण
सर्पमित्र म्हटला की स्वाभाविकपणे पुरुषाचाच चेहरा प्रत्येकाच्या डोळ्यांपुढे येतो. सापाला न डगमगता अत्यंत शिताफीने आणि हातचलाखीने त्याला संरक्षक पिशवीत कैद करून सुरक्षित ठिकाणी सोडणारा असा तो सर्पमित्र. पण निशा कुंजू नामक तरुणीने या पुरुषी परीकल्पनेला झुगारून या क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.
घरात पाल किंवा झुरळ दिसले तरी जोरात किंचाळणाऱ्या मुली अथवा महिला आपण आजवर पाहिल्या. त्यामुळे त्यांनी सापाच्या वाटेला जाणे, ही लांबचीच गोष्ट. निशा कुंजू मात्र याबाबतीत अपवाद ठरते. प्राणिमात्रांवर दया हाच धर्म मानून तिने आजवर हजारो सापांसह इतर वन्य प्राण्यांचा जीव वाचवला आहे. २००५ साली तिने पहिल्यांदा साप पकडला आणि त्याला जीवनदान दिले. आता तर दर दिवसाला किमान दोन सापांना त्यांच्या सुरक्षित अधिवासात सोडण्याचा प्रयत्न ती करते. त्याशिवाय वीजवाहिन्या, पतंगांचा मांजा, केबल, इमारतींना बसविलेल्या लोखंडी जाळ्यांत अडकलेल्या प्राणी-पक्ष्यांना ती सुरक्षितरीत्या बाहेर काढून त्यांच्यावर उपचार करते.
सरकार आणि अनेक सामाजिक संस्थांनी तिच्या या कार्याची दखल घेऊन तिला सन्मानित केले. ‘कर्मवीरचक्र’ आणि ‘कर्मवीर पुरस्कार’ या जागतिक पुरस्कारांची ती मानकरी ठरली आहे. जागतिक महिला दिनानिमित्त केंद्र शासनाने सन्मानित केलेल्या आघाडीच्या १०० महिलांतही तिचा समावेश होता.
* कोरोनाकाळात ‘ती’ बनली गर्भवती महिलांची माता
कोरोनाकाळ हा आरोग्य क्षेत्रासाठी सर्वाधिक कसोटीचा ठरला. उपचार साहित्याचा तुटवडा, बेड्सची तोकडी संख्या, संसर्ग होण्याची सर्वाधिक भीती या आणि अशा अन्य समस्यांवर मात करीत राज्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी अविरत रुग्णसेवा दिली. आजही तितक्याच तत्परतेने ते आपले काम पार पाडत आहेत. नायगाव येथील पालिकेच्या महिला प्रसूतिगृहाच्या प्रमुख डॉ. कविता साळवे याही त्यापैकीच एक आहेत.
कोरोनाकाळात पालिकेच्या रुग्णालयांत दाखल होणाऱ्या गर्भवती महिलांची जबाबदारी या माउलीकडे होती. एकाही मातेला किंवा तिच्या बाळाला दगाफटका होता कामा नये, असा दृढ निश्चय करीत डॉ. कविता यांनी अहोरात्र मेहनत केली. त्यांना त्यांच्या मेहनतीचे फळही मिळाले. आतापर्यंत या प्रसूतिगृहात दाखल झालेल्या सर्व गर्भवती किंवा नवजात बालके सुखरूप आपल्या घरी गेली आहेत. बेड्सची संख्या अपुरी पडत असल्यास अन्य रुग्णालयांत गर्भवतींची व्यवस्था करणे, रात्री-अपरात्री रुग्णांचे किंवा त्यांच्या नातेवाइकांचे फोन आल्यास प्रसूतिगृहाच्या प्रमुख या नात्याने त्यांना समाधानकारक उत्तरे देणे, आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास सहकाऱ्यांना धीर देण्यासह संसाराचे चाक अखंड सुरू ठेवण्यासाठी मेहनत करणे अशी कसरत त्यांना सध्या करावी लागत आहे. यात खूप दमछाक होत असली तरी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांच्या ओठावरचे हसू ऊर्जाधारी लस बनून सारा थकवा दूर करते, अशी प्रतिक्रिया त्यांनी ‘लोकमत’ला दिली.
......................