मुंबई - शस्त्रक्रियेनंतर राजकारणात सक्रिय झालेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सध्या दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवार आणि निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्यात एक महत्त्वाची बैठक झाली. त्यानंतर, शरद पवारांच्या निवासस्थानीच विरोधी पक्षातील १५ ते २० बड्या नेत्यांची उद्या बैठक होणार आहे. या भेटीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. विरोधी पक्षांची मोट बांधण्यात येत असलेल्या या बैठकीत काँग्रेस सहभागी होण्याची शक्यता नसल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं.
शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी विरोधी पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांची उद्या बैठक होत आहे. या बैठकीला राष्ट्रीय जनता दल, आम आदमी पक्षासह इतर पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत. तृणमूलचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी राष्ट्रमंच नावानं एक व्यासपीठ सुरू केलं आहे. याच राष्ट्रमंचाच्या बॅनरखाली उद्या शरद पवार आणि विरोधकांची बैठक होत आहे. या नेत्यांच्या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा होईल. यै बैठकीला काँग्रेसचा प्रतिनिधी किंवा नेता उपस्थित राहणार आहे की नाही, याबद्दलची अधिकृत माहिती नाही. मात्र, नाना पटोले यांनी या बैठकीत काँग्रेस सहभागी होण्याची शक्यता नसल्याचे म्हटलं आहे. तसेच, पवारांची आजही भूमिका नवी नसल्याचंही ते म्हणाले.
शरद पवार यांच्या दिल्लीतील बैठकीबाबत बोलताना, पवार साहेबांचा हा काही पहिला प्रयत्न नाही. ज्या ज्या वेळी राजकीय समीकरण बदलतात, राजकारणात वेगळे वारे वाहू लागतात, तेव्हा पवारांनी अशा भूमिका घेतलेल्या आहेत. त्यामुळे यात नवीन काही आहे, असं म्हणणं चुकीचं असल्याचं पटोले यांनी म्हटल. त्यामुळे, उद्याच्या बैठकीत काँग्रेसचे नेते सहभागी होण्याची शक्यता नसल्याचे दिसून येते. तसेच, त्यात महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचाही विषय नसल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
यूपीए की तिसरी आघाडी?
शरद पवारांनी काँग्रेसप्रणित यूपीएचं नेतृत्त्व करावं, अशी भूमिका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अनेकदा मांडली आहे. मात्र काँग्रेस याबद्दल फारशी उत्सुक नाही. आता शरद पवारांनी दिल्लीत विरोधकांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे पवार तिसरी आघाडी तयार करत आहेत का, अशी चर्चा दिल्लीत सुरू झाली आहे. २०२४ च्या लोकसभेआधी भाजपविरोधात महाआघाडीची गरज असल्याचं विधान काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केलं होतं.