Join us

सनबर्न नव्हे; आमचे ‘मूनलाइट’ संमेलन

By admin | Published: January 05, 2017 6:31 AM

कोणत्याही देखाव्यापेक्षा संमेलनातून निघणारे ‘आउटपूट’ आम्हाला महत्त्वाचे वाटते. त्यामुळे जागतिक मराठी संमेलनासाठी नोंदणी, प्रतिनिधी, प्रवेश प्रक्रिया वगैरे बडेजाव

मुंबई : कोणत्याही देखाव्यापेक्षा संमेलनातून निघणारे ‘आउटपूट’ आम्हाला महत्त्वाचे वाटते. त्यामुळे जागतिक मराठी संमेलनासाठी नोंदणी, प्रतिनिधी, प्रवेश प्रक्रिया वगैरे बडेजाव आम्हाला मान्य नाही. अंधारातून प्रकाशाकडे नेणारे आमचे संमेलन आहे. हे सनबर्न नव्हे, तर शीतल असे ‘मूनलाइट’ संमेलन आहे, असे भाष्य ज्येष्ठ वात्रटिकाकार व जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे यांनी केले.जागतिक मराठी अकादमी व श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ (ट्रस्ट) यांच्या संयुक्त विद्यमाने ७ व ८ जानेवारी रोजी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या जागतिक मराठी संमेलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी संमेलनाच्या एकंदर प्रक्रियेविषयी माहिती दिली. जागतिक मराठी संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक वगैरे फार्स आम्ही करत नाही. यासाठी आमची समिती एकत्रित येते आणि त्यातून एकमताने अध्यक्ष निवडला जातो. संमेलनात अनावश्यक खर्चाला कात्री लावणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट असते आणि यंदाच्या संमेलनातही आम्ही ते पाळले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान, शिवाजी मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या या दोन दिवसीय संमेलनात सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल आहे. ‘शोध मराठी मनाचा’ अशी या संमेलनाची संकल्पना असून, अमेरिकास्थित उद्योगपती अविनाश राचमाले यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होणार आहे. रसिकांना विनामूल्य प्रवेश असलेल्या या संमेलनातून ‘चित्र-शिल्प-काव्य’, ‘वेगळ्या वाटा’, ‘समुद्रापलीकडे’, ‘लक्ष्मीची पाऊले’, ‘माझा चित्रप्रवास’, तसेच विविध मुलाखती आदी कार्यक्रमांची बहुरंगी मेजवानी मिळणार आहे. (प्रतिनिधी)