फॉरेन्सिक अहवालातून समोर; स्फाेटकांनी भरलेली कार, मनसुख हिरेन मृत्यूप्रकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचे गूढ कायम असताना, विक्रोळीतून त्यांची स्कॉर्पिओ चोरीला जाताना ती चाेरी करताना कारसाेबत कुठलीही छेडछाड झाली नसल्याची माहिती फॉरेन्सिक अहवालातून समोर आली. त्यामुळे उद्याेगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फाेटके सापडलेल्या त्या ‘स्काॅर्पिओ’चे गूढ आणखी वाढले आहे.
ठाण्यात राहणारे मनसुख हिरेन यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, १७ फेब्रुवारी रोजी सीएसएमटी येथे काम असल्याने ते स्कॉर्पिओतून निघाले. मुलुंड-ऐरोली पुलापर्यंत पोहाेचताच कारचे स्टेअरिंग जाम झाल्यामुळे येथीलच सर्व्हिस रोडवर गाडी पार्क करून ते पुढे गेले. १८ फेब्रुवारीला कार पार्क केलेल्या ठिकाणी ते गेले असता तेथे कार नसल्याने त्यांनी विक्रोळी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर हीच कार उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ जिलेटिनच्या कांड्यांसह सापडली. कारची ओळख पटताच हिरेन यांची चौकशी सुरू झाली आणि त्यादरम्यान अचानक त्यांचा मृतदेह सापडल्याने प्रकरणांचे गूढ वाढले.
राष्ट्रीय तपास यंत्रणेने स्फोटके असलेल्या स्कॉर्पिओचा तपास सुरू केला. स्कॉर्पिओ सापडल्यानंतर तपास करणाऱ्या फॉरेन्सिक टीमच्या निदर्शनास काही गोष्टी आल्या आहेत. फॉरेन्सिक अहवालानुसार, हायवेवरून ज्या वेळी ही कार चोरी झाली त्या वेळी कारचा दरवाजा खोलण्यासाठी किंवा चोरी करण्यासाठी कुठलीही छेडछाड, तोडफोड करण्यात आलेली नाही. तसेच तसे कुठलेही निशाण सापडलेले नाही. याचा अर्थ कार चोरी करणाऱ्या व्यक्तीने अगदी सहजपणे कार त्या ठिकाणाहून चोरी केल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत तपास यंत्रणा अधिक तपास करीत आहेत.
...........................