मुंबई : औरंगाबाद जिल्ह्याच्या नामांतरणाला केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री आणि आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी तीव्र विरोध केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नामांतराचे वाद राज्य सरकारने बाजूला ठेवायला हवे. आधीच जनता खडतर दिवसांना सामोरी जात असताना विकासाचे, विधायक मुद्दे बाजूला ठेऊन सत्ताधाऱ्यांनी नामांतराचे मुद्दे रेटू नयेत, असे आठवले यांनी सांगितले.
औरंगाबाद जिल्ह्याच्या नामांतराला आरपीआयचा तीव्र विरोध आहे. औरंगाबादचे नाव औरंगाबादच राहिले पाहिजे, त्याचे नामांतर करता कामा नये. या सरकारने औरंगाबादचे नाव बदलण्याचा प्रयत्न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देणारा व्हिडीओ आठवले यांनी रविवारी जारी केला होता. खूप काळापासून या जिल्ह्याचे नाव औरंगाबादच आहे, तो बदलण्याचा अट्टहास करता कामा नये, असे आठवले यांनी म्हटले होते.
यासंदर्भात विचारणा केली असता, सध्या कोरोनाचे संकट आहे. अशा वेळी नामांतरणासारखे मुद्दे आणू नयेत, अशी भूमिका आठवले यांनी मांडली. छत्रपती संभाजी महाराजांना आम्ही आदर्श मानणारे आहोत. मात्र संभाजी महाराजांच्या नावाचा कोणी राजकारणासाठी वापर करू नये, असे मत व्यक्त करतानाच विधायक कामांसाठी राजकारण व्हायला हवे असेही ते म्हणाले. आम्ही १७ वर्षे नामांतराच्या आंदोलनाची धग भोगली आहे. त्यामुळे औरंगाबादचे आता नामांतर करू नये. रिपब्लिकन पक्षाचा विरोध राहील असेही आठवले म्हणाले.
सध्या कोरोनामुळे नामांतराला विरोध आहे. मात्र, कोरोनानंतर पाठिंबा देणार का, अशी विचारणा केली असता, सध्या तरी आमचा विरोध आहे. कोरोनानंतर पुढचा निर्णय घेऊ असेही आठवले यांनी स्पष्ट केले.