Join us  

पुन्हा सलीम दुर्रानी होणे नाही; मुंबईचा किस्सा सांगत आव्हाडांनी जागवल्या आठवणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2023 1:37 PM

सलिम दुर्राणी कशाप्रकारे चाहत्यांच्या आग्रहानंतर सिक्सर मारायचे आणि एका सामन्यात त्यांना घेतलं नव्हतं, तेव्हा कशारितीने मुंबईकर त्यांच्या पाठिशी उभारले होते, याची आठवणही आव्हाड यांनी सांगितली आहे.  

मुंबई - भारतीय क्रिकेट विश्वासाठी आजचा दिवस वाईट बातमी घेऊन आला. टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू आणि सिक्सर किंग सलीम दुर्रानी यांचे गुजरातच्या जामनगरमध्ये निधन झाले आहे. ते ८८ वर्षांचे होते. त्यांच्या निधनानंतर क्रिकेटसह इतरही क्षेत्रातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही ट्विटरवरुन सलिम दुर्राणींच्या काही आठवणी शेअर केल्या आहेत. तसेच, शरद पवार यांच्याहस्ते त्यांचा ठाण्यात करण्यात आलेल्या सत्काराचा उल्लेखही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये केला. 

सलिम दुर्राणी कशाप्रकारे चाहत्यांच्या आग्रहानंतर सिक्सर मारायचे आणि एका सामन्यात त्यांना घेतलं नव्हतं, तेव्हा कशारितीने मुंबईकर त्यांच्या पाठिशी उभारले होते, याची आठवणही आव्हाड यांनी सांगितली आहे.  

जितेंद्र आव्हाड यांची पोस्ट

सलिम हा डावखुरा गोलंदाज, डावखुरा फलंदाज होता. खांद्यात प्रचंड ताकद. त्यामुळे गोलंदाजी करताना खांद्याचा वापर करून एक आगळी वेगळी बॉलिंग स्टाईल असायची. बॅटिंग करताना तो मैदानात राजा असल्यासारखा वागायचा. पब्लिक मधून आवाज आला Salim We Want Sixer. तर पुढचे 2-3 बॉल गोलंदाज टाकत असतं त्यामध्ये एक तरी सिक्सर तो मारतच असे. त्यामुळे लोकांमध्ये तो प्रचंड लोकप्रिय होता.

मुंबईच्या एका मॅचमध्ये जेव्हा त्याला भारतीय संघातून वगळण्यात आलं तेव्हा संपूर्ण मुंबई त्याच्या मागे उभी राहिली आणि स्टेडियममध्ये बोर्ड लागले No Durani..No Match. असा हा क्रिकेट विश्वावर राज्य करणारा सलिम हा भारतातील प्रत्येक क्रिकेट प्रेमीच्या हृदयात होता. आज तो आपल्यातून निघून गेला. मी त्याचा आदरणीय शरद पवार साहेबांच्या हस्ते गडकरी रंगायतन, ठाणे येथे सत्कार केला होता. तेव्हा त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट संबंधी खुप काही चर्चा केल्या होत्या. माझे त्याच्याशी फार चांगले संबंध होते. आज त्याच्या निधनाची वार्ता ऐकून धक्काच बसला. परत सलिम दुराणी होणे नाही हे मात्र तितकेच खरे.

दरम्यान, आयसीसीचे माजी चेअरमन आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सलीम यांना श्रद्धाजली वाहिली आहे. तसेच, त्यांच्या निधनाचे दु:ख झाले असून कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहोत, असेही पवार यांनी म्हटलंय.   

टॅग्स :शरद पवारभारतीय क्रिकेट संघजितेंद्र आव्हाड