ट्विटरवर नको, संसद भवनातील शिवरायांच्या पुतळ्यासमोर मुजरा करा - उद्धव ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2018 10:15 AM2018-02-21T10:15:36+5:302018-02-21T10:21:26+5:30
आज मंत्रालयात ‘कॅबिनेट’नामक अष्टप्रधान मंडळ पाण्यातील म्हशीसारखे बसते. ते हलतच नाही. थापा मारणे व फसवणे हाच लोकशाहीतील अष्टप्रधान मंडळाचा उद्योग झाला आहे.
मुंबई - शिवजयंतीला छत्रपती शिवाजी महाराजांचे ट्विटरवरुन स्मरण करणाऱ्यांवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून उपरोधिक टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरवरुन छत्रपतींचे स्मरण केले. त्यावर उद्धव यांनी टीका केली आहे. छत्रपती हे ‘ट्विटर’वर स्मरण करण्यासाठी नाहीत. देशाच्या प्रधानमंत्र्यांनी व राज्यकर्त्यांनी राजांच्या ‘जयंती’स संसद भवनातील शिवरायांच्या पुतळ्यासमोर मुजरे झाडायलाच हवेत असे अग्रलेखात म्हटले आहे.
छत्रपती हे राजकारणासाठी व ‘मराठा’ मतांसाठी होर्डिंगवर मिरवायची वस्तू नाही. राजांचे आचरण व हिंदुत्व प्रत्यक्ष कृतीत आणणे हेच त्यांचे खरे स्मरण ठरेल. राजांचे अष्टप्रधान मंडळ होते व जनतेच्या हिताचे निर्णय त्या अष्टप्रधान मंडळात होत असत. रयतेच्या काडीलाही आपल्या शिपायांनी व सरदारांनी हात लावू नये असे त्यांचे आज्ञापत्रच होते. आज मंत्रालयात ‘कॅबिनेट’नामक अष्टप्रधान मंडळ पाण्यातील म्हशीसारखे बसते. ते हलतच नाही. थापा मारणे व फसवणे हाच लोकशाहीतील अष्टप्रधान मंडळाचा उद्योग झाला आहे अशी टीका फडणवीस सरकारवर करण्यात आली आहे.
काय म्हटले आहे अग्रलेखात
- छत्रपती शिवराय होते म्हणून वासुदेव बळवंत फडके उभे राहिले. लोकमान्य टिळक, सरदार पटेल निर्माण झाले. स्वातंत्र्यवीर सावरकर, भगतसिंग, राजगुरू, चापेकर बंधू निर्माण झाले. छत्रपतींच्या प्रेरणेनेच बाळासाहेब ठाकरे यांनी ‘शिवसेना’ उभी केली. छत्रपती होते म्हणूनच महाराष्ट्राला आणि देशाला इतिहास लाभला. भूगोल तर पाकिस्तानासही आहे. अशा छत्रपतींना सदैव दंडवत. छत्रपतींना मतांसाठी, जातीसाठी वापरू नका. ‘ट्विटर’वर स्मरण करण्यासाठी छत्रपती नाहीत. ते आमचा पंचप्राण आहेत!
- हिंदवी स्वराज्य संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तारखेनुसार साजरी झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिवरायांच्या जन्मस्थानी म्हणजे शिवनेरी किल्ल्यावर गेले. शिवजयंतीच्या सोहळ्यात ते सहभागी झाले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद हेदेखील दिल्लीतील शिवजयंतीच्या भव्य सोहळ्यास उपस्थित राहिले. ‘‘शिवाजी महाराजांचे कार्य प्रेरणादायी आहे. त्यांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवून स्वकीयांमध्ये आत्मसन्मान जागविला,’’ असे गौरवोद्गारही राष्ट्रपतींनी काढले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनीही छत्रपतींचे स्मरण केले आहे. हे स्मरण या मंडळींनी ‘ट्विटर’वर केले आहे. छत्रपती हे शूर होते व त्यांचे साहस प्रेरणादायी असल्याचे या मोठय़ा माणसांनी ‘ट्विटर’वर सांगितले. हे मोठय़ाच साहसाचे काम आहे. छत्रपती हे शौर्य आणि राष्ट्रभक्तीच्या बाबतीत विश्वपुरुष होते. त्यांनी मोगलांचे म्हणजे स्वराज्याच्या शत्रूचे कोथळे काढून पहिले हिंदवी स्वराज्य स्थापन केले.
- छत्रपतींनी युद्ध केले. शेकडो किल्ले बांधले. पण स्वतःचा महाल उभा केला नाही किंवा त्यांच्या हिंदवी स्वराज्याचे भव्य, आलिशान असे पक्ष कार्यालय उभे केले नाही. गोरगरीब शेतकरी, सर्वसामान्य मावळे हाच त्यांचा पक्ष होता. हा रयतेचा पक्ष होता. इतर राजे-महाराजांप्रमाणे छत्रपतींचा सोन्याचा दरबार नव्हता व सिंहासनही नव्हते.
- छत्रपती हे सहय़ाद्रीच्या कड्याकपाऱ्यांतील वाघ होते व या वाघाने हिंदवी स्वराज्याची डरकाळी फोडताच मोगलांची सिंहासने हादरत होती. छत्रपती नसते तर काय झाले असते याचे वर्णन उत्तरेतील कवी ‘भूषण’ याने केलेच आहे.
काशी की कला जाती, मथुरा की मसजीद होती
अगर शिवाजी न होते, तो सुनत सबकी होती…
या एका कडव्यातच छत्रपतींचे शौर्य आणि मोठेपण दडले आहे. या शौर्यास रोजच मानवंदना द्यायला हवी. महाराष्ट्रात व दिल्लीत रोजच २१ तोफांची सलामी त्यांना द्यायला हवी. देशाच्या प्रधानमंत्र्यांनी व राज्यकर्त्यांनी राजांच्या ‘जयंती’स संसद भवनातील शिवरायांच्या पुतळ्यासमोर मुजरे झाडायलाच हवेत. ट्विटरवरून छत्रपतींचे स्मरण करणारे सर्व मोठे नेते आहेत. ते कार्यमग्न आहेत. त्यामुळे त्यांनी ट्विट करून शिवरायांप्रति त्यांचा आदरभाव व्यक्त केला हे मान्य केले तरी छत्रपती हे राजकारणासाठी व ‘मराठा’ मतांसाठी होर्डिंगवर मिरवायची वस्तू नाही. छत्रपती हे ‘ट्विटर’वर स्मरण करण्यासाठी नाहीत. किंबहुना राजांचे आचरण व हिंदुत्व प्रत्यक्ष कृतीत आणणे हेच त्यांचे खरे स्मरण ठरेल.
- महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी छत्रपतींविषयी निंदाजनक शब्द वापरल्याने माहोल खराब झाला आहे. भीमा-कोरेगाव दंगलीने छत्रपतींचा महाराष्ट्र आधीच अस्वस्थ झाला आहे. छत्रपतींच्या राज्यात फालतू लोकशाही नव्हती. पण ‘शिवशाही’ नावात विधायक हुकूमशाही होती. राजांचे अष्टप्रधान मंडळ होते व जनतेच्या हिताचे निर्णय त्या अष्टप्रधान मंडळात होत असत. रयतेच्या काडीलाही आपल्या शिपायांनी व सरदारांनी हात लावू नये असे त्यांचे आज्ञापत्रच होते. आज मंत्रालयात ‘कॅबिनेट’नामक अष्टप्रधान मंडळ पाण्यातील म्हशीसारखे बसते. ते हलतच नाही. थापा मारणे व फसवणे हाच लोकशाहीतील अष्टप्रधान मंडळाचा उद्योग झाला आहे. पंतप्रधान मुंबईत आले व मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या कार्यक्रमात म्हणाले, ‘महाराष्ट्रात ३५ लाख नवे रोजगार निर्माण होतील.’ आम्ही त्यांच्या भाषणाचे स्वागत करतो. ‘मेक इन इंडिया’च्या पायाभरणी समारंभातही ते हेच बोलले. फक्त आकडे बदलले.
- चार वर्षांत किती हजारांना नोकऱ्या मिळाल्या ते सांगा. भविष्यातील पस्तीस लाख नोकऱ्यांचे नंतर पाहू. पंतप्रधानांनी व मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न करीत राहावे, पण त्यांनी खोटे बोलू नये. शिवाजी महाराज खोटे बोलत नव्हते. त्यांनी औरंगजेब, अफझलखानासही थापा मारल्या नाहीत. छत्रपतींनी पुढून वार केले. पाठीत खंजीर खुपसले नाहीत. छत्रपतींनी राज्याभिषेक केला तो रयतेसाठी व हिंदुत्वासाठी. त्यांच्या सैन्यात मुसलमान व रोहिले पठाण होते. त्यांचे राज्य ‘हिंदवी’ होते, पण ते सगळय़ांचे होते. त्यांची न्यायव्यवस्था चोख होती. म्हणून ते न्यायाचे राज्य होते. छत्रपतींनी ‘मोगलां’ना झुंजवत ठेवले. ते गनिमी काव्याने लढले. पण हिंदवी स्वराज्याच्या सैनिकांचे नाहक प्राण जाऊ दिले नाहीत. छत्रपती शिवाजी नसते तर ‘साहस’ व ‘प्रेरणा’ हे दोन्ही शब्द तेजोहीन झाले असते. शौर्य शब्दास वाळवी लागली असती. ‘हिंदुत्व’ गर्भातच खतम झाले असते. पाकिस्तानच्या सीमा थेट तुमच्या-आमच्या अंगणापर्यंत येऊन पोहोचल्या असत्या व पुढच्या पिढ्या नमाज पढताना दिसल्या असत्या. छत्रपती नसते तर १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धास प्रेरणाच मिळाली नसती. छत्रपती शिवराय होते म्हणून वासुदेव बळवंत फडके उभे राहिले. लोकमान्य टिळक, सरदार पटेल निर्माण झाले. स्वातंत्र्यवीर सावरकर, भगतसिंग, राजगुरू, चापेकर बंधू निर्माण झाले. छत्रपतींच्या प्रेरणेनेच बाळासाहेब ठाकरे यांनी ‘शिवसेना’ उभी केली. छत्रपती होते म्हणूनच महाराष्ट्राला आणि देशाला इतिहास लाभला. भूगोल तर पाकिस्तानासही आहे. अशा छत्रपतींना सदैव दंडवत. छत्रपतींना मतांसाठी, जातीसाठी वापरू नका. ‘ट्विटर’वर स्मरण करण्यासाठी छत्रपती नाहीत. ते आमचा पंचप्राण आहेत!