मुंबई : हेल्मेट घातली नाही म्हणून पोलिसांनी केलेल्या कारवाईचा राग आला म्हणून एका बाइकस्वाराने थेट पोलिसाच्या अंगावर गाडी नेत मारहाण केल्याची घटना बोरिवलीत घडली. याप्रकरणी एमएचबी कॉलनी पोलिसांनी सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली. पोलीस शिपाई दीपक कांबळे (४०) बोरिवलीतील न्यू लिंक रोडच्या वाहिनीवर कर्तव्य बजावत असताना एक बाइकस्वार विनाहेल्मेट गाडी चालवत असलेला दिसला. कांबळे यांनी त्याला हटकताच चालकाने दुचाकी त्यांच्या अंगावर घातली.
तसेच कांबळे यांच्यासोबत झटापट करत त्यांची कॉलर पकडून त्यांना धक्काबुकी केली व मारहाण करत बघून घेण्याची धमकीही दिली. तेथून बाइकस्वार पसार झाला. कांबळे यांच्या तक्रारीवरून एमएचबी कॉलनी पोलिसांनी अनोळखी बाइकस्वाराविरोधात गुन्हा नोंदवत अधिक तपास करीत आहेत.