वरळी नाही, संपूर्ण मुंबई लक्ष्य, देवेंद्र फडणवीस यांचा शिवसेनेवर थेट निशाणा, सत्तेची प्रतिष्ठापना करण्यासाठी चढाओढ सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2022 07:00 AM2022-09-02T07:00:26+5:302022-09-02T07:01:28+5:30

Devendra Fadnavis : भाजप आणि  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना एकत्र येऊन आम्ही वरळीबराेबरच मुंबई महापालिका निश्चितपणे जिंकू, असा निर्धार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

Not Worli, entire Mumbai target, Devendra Fadnavis direct target, fight to establish power begins | वरळी नाही, संपूर्ण मुंबई लक्ष्य, देवेंद्र फडणवीस यांचा शिवसेनेवर थेट निशाणा, सत्तेची प्रतिष्ठापना करण्यासाठी चढाओढ सुरू

वरळी नाही, संपूर्ण मुंबई लक्ष्य, देवेंद्र फडणवीस यांचा शिवसेनेवर थेट निशाणा, सत्तेची प्रतिष्ठापना करण्यासाठी चढाओढ सुरू

Next

मुंबई : भाजप आणि  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना एकत्र येऊन आम्ही वरळीबराेबरच मुंबई महापालिका निश्चितपणे जिंकू, असा निर्धार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. त्यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ५ सप्टेंबरला मुंबईत येत असून, या भेटीच्या निमित्ताने मुंंबईतील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हं आहेत. 

लोकमत मीडियाचे चेअरमन विजय दर्डा यांच्यासह चार चित्रकारांच्या ‘फोर स्टोरीज’ या चित्रप्रदर्शनाला फडणवीस यांनी सपत्नीक भेट दिली; त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. मुंबई भाजपने सध्या शहरात मोठ्या प्रमाणात पोस्टरबाजी सुरू केली आहे. त्यात आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदार संघावर अधिक भर देण्यात आला आहे. याकडे लक्ष वेधले असता, फडणवीस म्हणाले की, केवळ वरळीच नाही तर पूर्ण मुंबईवर आमचा फोकस आहे. आम्हाला मुंबई महापालिका जिंकायची आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि भाजप मिळून मुंबई महापालिका जिंकेल. शिवसेनेच्या जुन्याजाणत्या नेत्यांना भेटून सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करताना शिंदे दिसत आहेत. 

मुख्यमंत्री शिंदे शिवतीर्थावर; राज ठाकरेंशी चर्चा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांची तीन दिवसांपूर्वी भेट घेऊन तासभर चर्चा केली होती. गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी जाऊन गणपतीचे दर्शन घेतले व ठाकरे यांच्याशी जवळपास ४० मिनिटे चर्चा केली. 
मुंबई, ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या चर्चेला महत्त्व आहे. राजकीय चर्चा झाली नाही, जुन्या आठवणींना उजाळा दिला, असे स्पष्टीकरण शिंदे यांनी माध्यमांकडे दिले. शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री व शिवसेना नेते मनोहर जोशी यांच्या घरी जाऊन गणपतीचे दर्शन घेतले. शिवसेनेचे सचिव आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्ती मिलिंद नार्वेकर यांच्या निवासस्थानी जाऊन शिंदे यांनी गणपतीचे दर्शन घेतले.

शिवाजी पार्कवरील मेळावा कोणाचा? 
शिवाजी पार्कवरील शिवसेना मेळाव्याबाबतची अनिश्चितता कायम आहे. मुंबई पालिकेने मेळाव्यासाठीची परवानगी दिलेली नाही. आमचाच मेळावा होणार, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. याचठिकाणी आयोजन करण्याची भूमिका शिंदे गट घेणार का? याबाबत उत्सुकता कायम आहे.

दोन महिन्यांत स्था. स्व. संस्थांच्या निवडणुका?
फडणवीस यांच्या या विधानानंतर आता मुंबई पालिकेतील शिवसेनेची सत्ता संपुष्टात आणण्यासाठी भाजप कंबर कसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 
महापालिका निवडणुका पुढील वर्षीच्या सुरूवातीला होतील, असे म्हटले जात असताना दोन-अडीच महिन्यांतच मुंबई पालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची तयारी भाजपने चालविली आहे. 
गणेशोत्सवाच्या निमित्ताने शिंदे-फडणवीस यांच्या राजकीय गाठीभेटींना महत्त्व आले आहे. शिवसेनेच्या जुन्याजाणत्या नेत्यांना भेटून सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करताना शिंदे दिसत आहेत. 

अमित शहा  सोमवारी मुंबईत
 केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे ५ सप्टेंबरला मुंबईत येत आहेत. लालबागचा गणपती, सिद्धिविनायक आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्याकडील गणरायाचे दर्शन ते घेतील. 
 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांची भेट घेणार आहेत. शिवसेना-भाजप सरकारच्या पाठीशी पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा भक्कमपणे उभे आहेत, निश्चितच शहा यांची मी भेट घेईन, असे शिंदे यांनी पत्रकारांना सांगितले. 
 मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या पदाधिकाऱ्यांना शहा मार्गदर्शन करतील, अशीही शक्यता आहे. काही ना काही राजकीय बैठक होईलच, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांना सांगितले.

अंबानींकडील गणरायाचे दर्शन
मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, अमृता फडणवीस यांनी प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया निवासस्थानी जाऊन गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी नीता अंबानी व अन्य कुटुंबीय उपस्थित होते.

Web Title: Not Worli, entire Mumbai target, Devendra Fadnavis direct target, fight to establish power begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.