मुंबई - भारताच्या शेजाऱ्यांवर चीनचा प्रभाव असणे स्वाभाविक आहे. परंतु, केंद्र सरकारला त्याबाबत चिंता करण्याचे कारण नाही, अशा शब्दांत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी आश्वस्त केले. पवई येथील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’ (आयआयएम) येथे मंगळवारी एका कार्यक्रमात ते बोलत होते.
भारताची सागरी क्षमता वाढली असून, ती केवळ संकटात सापडलेल्यांना मदत करण्यापुरती मर्यादित नाही. भारत-चीन डावपेचांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या लाल समुद्रातही भारतीय नौदल सक्रिय भूमिका बजावत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. लाल समुद्रातील चाचेगिरी आणि व्यापारी जहाजांवरील ड्रोन हल्ले केंद्राच्या वतीने सक्षमपणे हाताळले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
मालदीव-भारतातील वाढत्या तणावाबद्दल ते म्हणाले, मालदीवचे नवे अध्यक्ष मोहम्मद मुइझू हे चीन समर्थक म्हणून पाहिले जातात. या प्रदेशात चीनचा प्रभाव वाढतो आहे. परंतु याला भारतीय मुत्सद्देगिरीचे अपयश म्हणणे चुकीचे ठरेल. चीनचा आपल्या शेजारी राष्ट्रांवर प्रभाव असला तरी त्यामुळे भारताने घाबरून जाण्याचे कारण नाही. हे आंतरराष्ट्रीय राजकारण आहे. त्यात आपण पूर्णक्षमतेने उतरले पाहिजे, अशी टिप्पणी त्यांनी केली.
पश्चिम आशियातील संकट...पश्चिम आशियातील संकटाबाबत भाष्य करताना जयशंकर म्हणाले, अनेक दशकांपासून चाललेल्या इस्रायल-पॅलेस्टाइन संघर्ष संपवण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे. दोन स्वतंत्र राष्ट्रांच्या निर्मितीने हा प्रश्न सुटेल अशी भारताची भूमिका राहिली आहे. हमासच्या हल्ल्यात सुमारे बाराशे लोक मारले गेले, तर जवळपास अडीचशे इस्रायली आणि इतर नागरिकांना हमासने ओलिस ठेवले होते. एक देश म्हणून इतका दहशतवाद अनुभवल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्त्रायलने गाझा पट्टीमध्ये हल्ले केले. फक्त याप्रकारे प्रत्युत्तर देताना आंतरराष्ट्रीय कायदे पाळणे तितकेच महत्त्वाचे असते. जेणेकरून सामान्य नागरिकांची जीवितहानी टळेल, असे त्यांनी सांगितले.