मच्छीमारांनाही नोटकल्लोळचा फटका
By admin | Published: November 18, 2016 04:27 AM2016-11-18T04:27:27+5:302016-11-18T04:27:27+5:30
केंद्र सरकारने ५०० आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बंद केल्याचा फटका राज्यातील मच्छीमारांनाही बसला आहे.
मनोहर कुंभेजकर / मुंबई
केंद्र सरकारने ५०० आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बंद केल्याचा फटका राज्यातील मच्छीमारांनाही बसला आहे. रोख रकमेची चणचण असल्याने मुंबईसह, रायगड, पालघर, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथील मासेमारी व्यवहार ठप्प झाला असून मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली आहे.
राज्यातील ५० टक्के मच्छीमार नौका समुद्रकिनारी शाकारल्याची माहिती महाराष्ट्र राज्य मच्छीमार सहकारी संघाचे अध्यक्ष रामदास संधे यांनी दिली. मच्छीमारांचा व्यवहार प्रामुख्याने जिल्हा बँका आणि सहकारी बँकेच्या माध्यमातून होतो. मात्र केंद्र सरकारने जिल्हा बँक आणि सहकारी पतपेढ्यांना घातलेल्या निर्बंधांमुळे मच्छीमार सहकारी संस्थांचे व्यवहार ठप्प झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे पंतप्रधानांनी नुकसान होणाऱ्या मच्छीमारांना शेतकऱ्यांप्रमाणे कर्जमाफीची सवलत द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
मुंबईतील ससून डॉक, भाऊचा धक्का, छत्रपती शिवाजी मंडई, दादर मंडई, मालाड येथील साईनाथ मंडई येथे लाखो रुपयांची मासळी विक्री होते. मात्र नोटाबंदीमुळे येथील घाऊकसह किरकोळ मासळी व्यवहारही ठप्प झाला आहे. मासळी नाशवंत असल्याने सडून जात असून मासे विक्रेत्यांचे नुकसान होत आहे. त्यात मासळी पकडण्यासाठी समुद्रात जायचे की घर खर्चासाठी बँकेबाहेर पैशांसाठी रांग लावायची, अशा चिंतेत मच्छीमार समाज अडकला आहे. सरकारने या स्थितीची दखल घ्यावी आणि मच्छिमारांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)