मुंबई - राज्यातील राजकारणात दररोज नवीन घडामोडी पाहायला मिळत आहे. सत्ता संघर्षाचा निकाल पुढील काही दिवसांत लागण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यातच, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा जाहीर केला. त्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याचं दिसून येत आहे. राष्ट्रवादीचे प्रमुख नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते शरद पवार यांच्या राजीनाम्याला विरोध करत आहेत. तर, अजित पवार यांनी शरद पवारांच्या निर्णयावर परखडपणे भूमिका मांडत नवीन अध्यक्ष त्यांच्या मार्गदर्शनात घडेल, असे म्हटले होते. त्यामुळे, राज्यातील महाविकास आघाडीच्या भवितव्यावरही चर्चा होत आहे. त्यातच, संजय राऊत यांनी ट्विट करुन सूचक विधान केलं आहे.
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून सातत्याने काहीतरी राजकीय घडामोडी होत आहेत. राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार रखडला असून शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला आहे. त्यातच, राष्ट्रवादीचे नेते अजित भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चाही झाल्या. तर, महाविकास आघाडीने मोठ्या जाणीवेतून वज्रमुठ सभांची घोषणा केली होती. मात्र, मुंबईनंतर आता पुढील वज्रमुठ सभा होतील की नाही, हाही प्रश्न उपस्थित आहे. त्यामुळे, महाविकास आघाडीत बिघाडी झाली की काय, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. दरम्यान, सत्तासंघर्षाचा निकाल, शरद पवारांचा राजीनामा, वज्रमुठ सभा आणि राजकीय अनिश्चितता या दरम्यान, संजय राऊत यांनी सूचक ट्विट केलंय.
शरद पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, त्याच दिवशी नवा अध्यक्ष निवडण्यासाठी समितीचीही घोषणा केली होती. या समितीची बैठक शुक्रवारी सकाळी मुंबईतील पक्षाच्या कार्यालयात होणार आहे. या बैठकीत शरद पवारांनी राजीनामा मागे घ्यावा, अशी विनंती करणारा ठराव होणार अशी चर्चा आहे. या समितीत असलेल्या बहुतांश नेत्यांनी पहिल्याच दिवशी पवारांनी आपला निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी जाहीरपणे केली होती. त्यामुळे हेच नेते समितीच्या बैठकीत वेगळी भूमिका घेण्याची शक्यता कमी आहे. मंगळवारी शरद पवारांनी राजीनामा दिल्यापासून या नेत्यांनी सलग तीन दिवस शरद पवारांबरोबर या विषयावर चर्चाही केली आहे. तसेच शरद पवारांनीही समितीचा निर्णय आपल्याला मान्य असेल, अशी भूमिका जाहीर केली आहे.
''राजकारणात अपघाताने काहीही घडत नाही. तसे झाल्यास, तुम्ही शर्यत लावू शकता की ते कशाप्रकारे नियोजित होते''. असे विधान संजय राऊत यांनी केलं आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष फ्रँकलीन डी. रुझवेल्ट यांचं हे वाक्य ट्विट करुन संजय राऊत यांनी नेमकं काय सूचवलंय, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. राष्ट्रवादीतील घडामोडी या अचानक घडत नाहीत, हेच राऊत सूचवत आहेत का, अशीही चर्चा सोशल मीडियात होतेय.
अध्यक्ष निवड समितीत खडसेंचा समावेश
राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष निवड समितीची मंगळवारी शरद पवारांनी घोषणा केली त्यावेळी एकनाथ खडसे यांचे नाव या समितीत नव्हते. मात्र गुरुवारी शरद पवारांनी खडसेंच्या नावाचा समावेश करण्याची सूचना केली. त्यानुसार या समितीत खडसेंचा समावेश करण्यात आला असून शुक्रवारच्या बैठकीला येण्यासाठी प्रफुल्ल पटेल यांनी खडसे यांना फोनही केल्याचे सूत्रांनी सांगितले.
अशी आहे समिती
समितीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, के.के. शर्मा, पी. सी. चाको, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, एकनाथ खडसे, दिलीप वळसे पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, जयदेव गायकवाड, फौजिया खान, धीरज शर्मा, सोनिया दूहन यांचा समावेश आहे.