Join us

बैठकांमधून काहीच होत नाही, संभाजीराजेंनी सांगितलं राज'कारण'; लढा सुरूच राहणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2023 2:31 PM

मराठा समाजाच्या आंदोलनाला वेगळी दिशा लागली आहे. सर्वसामान्यांच्या मनात भीतीचे वातावरण आहे.

मुंबई - मराठा समाजाने संयम बाळगण्याची आवश्यकता आहे. सरकारला वेळ द्यावा. सर्व पक्षाच्या नेत्यांनी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला वेळ देऊन सहकार्य करावे. आपले आंदोलन मागे घ्यावे असा ठराव सर्वपक्षीय नेत्यांनी बैठकीत मंजूर केला आहे. माझी मनोज जरांगेंना विनंती आहे, आमच्या प्रामाणिकपणावर त्यांनी विश्वास ठेवावा, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेसह सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या उपस्थितीत मराठा आरक्षणावर बैठक झाली. मात्र, या बैठकीला माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी अनुपस्थिती दर्शवली. तसेच, अशा बैठकांमधून काहीच होत नाही, त्यामुळे मी बैठकीला गेलो नाहीत. आमचा लढा सुरूच राहिल, असेही संभाजीराजेंनी म्हटले. 

मराठा समाजाच्या आंदोलनाला वेगळी दिशा लागली आहे. सर्वसामान्यांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे मराठा समाजाने शांतता ठेवावी, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठकीनंतर केले आहे. शरद पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर सर्व पक्षाचे ३२ नेते आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत विस्तृत चर्चा झाली. या चर्चेतून मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही भूमिका जी सरकारची आहे ती सर्वपक्षीय नेत्यांचीही आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. दरम्यान, या बैठकीवर भाष्य करताना संभाजीराजे छत्रपतींनी आमचा लढा सुरूच राहिल, अशा बैठकांमधून काहीही होत नाही, असे म्हटलं आहे.

मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत आहे, राज्यात आत्महत्या होत आहेत, मराठा आंदोलन तीव्र होत आहे. तरीदेखील सरकार केवळ बैठकांचा खेळ करीत आहे. अशा बैठकांमध्ये वेळ न दवडता सरकारने ठोस पावले उचलावीत. केंद्र सरकारनेही केवळ बघ्याची भूमिका न घेता तात्काळ या विषयामध्ये लक्ष घालून मराठा समाजाला आरक्षण द्यावे, हीच आमची अंतिम मागणी आहे, असे संभाजीराजेंनी म्हटले. 

गेल्या पंधरा वर्षांपासून मराठा आरक्षण चळवळीत सक्रिय असताना कोणत्याही सरकारने समाजासाठी बोलाविलेल्या एकाही शासकीय बैठकीस मी अनुपस्थित राहिलो नाही. दोन वेळेस आरक्षणही मिळाले होते मात्र, मागील सरकारच्या घोडचुकांमुळे दुर्दैवाने मराठा आरक्षण रद्द झाले व समाजाचा लढा परत एकदा तीव्र झाला. पण, सध्या आरक्षणाच्या नावाने केवळ पोकळ बैठकांचे सत्र चालू असल्याचे दिसून येत आहे. यातून कोणताही मार्ग निघत नाही अथवा आरक्षण कसे देणार, किती कालमर्यादेत देणार याचा मार्गही सांगितला जात नाही. सर्वपक्षीय मंडळी देखील मराठा आरक्षणाला पाठिंबा देतात, बैठकांना येतात. मात्र मार्ग सांगत नाहीत. मराठा समाजाला आरक्षण देणे यापेक्षा प्रत्येकाला आपापली व्होटबँक सांभाळणे अधिक महत्त्वाचे वाटत आहे. त्यामुळे आजच्या बैठकीस मी अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतला. समाज आता अशा बैठकांना भूलणार नाही, आरक्षण मिळेपर्यंत लढा सुरूच राहील, अशी भूमिका संभाजीराजेंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्ट केली आहे. 

टॅग्स :संभाजी राजे छत्रपतीमुंबईमराठामराठा आरक्षणमनोज जरांगे-पाटील