४०० कर्मचाऱ्यांना नोटिसा
By admin | Published: June 10, 2015 10:56 PM2015-06-10T22:56:09+5:302015-06-10T22:56:09+5:30
वसई-विरार पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या कामकाजासाठी पालिकेने मीरा-भार्इंदर पालिकेतील १ हजार १०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
भार्इंदर : वसई-विरार पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या कामकाजासाठी पालिकेने मीरा-भार्इंदर पालिकेतील १ हजार १०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या निवडणुकीचे प्रशिक्षण ३ व ८ जून रोजी विरार येथे आयोजित केले असता त्याला सुमारे ४०० कर्मचाऱ्यांनी दांडी मारल्याने निवडणूक प्रशासनाने या कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत.
वसई-विरार पालिकेसह मीरा-भार्इंदर पालिकेच्या प्रभाग क्र. ३८ अ या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. यामुळे पालिकेतील १,१६० कर्मचाऱ्यांना निवडणूक कामाला जुंपले आहे. वसई-विरार पालिकेने निवडणूक कामकाजासाठी मीरा-भार्इंदर पालिकेकडे कर्मचाऱ्यांची मागणी केली असता प्रशासनाने त्यांची यादी देण्यापूर्वीच वसई-विरार पालिकेने जिल्हा प्रशासनाकडून जुनी यादी प्राप्त केली आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे निलंबित, मयत, निवृत्त व अपंग कर्मचाऱ्यांसह एकूण १,१०० कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचे कार्यादेश पालिकेत धाडण्यात आले. त्यानुसार, मीरा-भार्इंदर पालिकेने सुरुवातीला ५५१ कर्मचाऱ्यांना निवडणुकीसाठी रवाना होण्याचे आदेश दिले. त्यातील २१५ कर्मचाऱ्यांचे कार्यादेश रद्द करण्यासाठी मीरा-भार्इंदर पालिकेने निवडणूक प्रशासनाला पत्र पाठविले आहे. परंतु, निवडणूक प्रशासनाने त्याला नकार देऊन उर्वरित ६०९ कर्मचाऱ्यांना ३ व ८ जून रोजी आयोजित प्रशिक्षणाला उपस्थित राहण्याचे फर्मान सोडले. तशी लेखी वैयक्तिक समजही कर्मचाऱ्यांना धाडली होती. परंतु, सुमारे ४०० कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणाला दांडी मारल्याने निवडणूक प्रशासनाने त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या नोटिसा धाडल्याने त्या कर्मचाऱ्यांची पाचावर धारण बसली आहे. दरम्यान, मीरा-भार्इंदर पालिका प्रशासन मात्र अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडण्यास तयार नसून हे कर्मचारी निवडणुकीच्या कामास जुंपल्यास शहरातील नागरिकांची कामे खोळंबून संभाव्य आपत्कालीन घटनेत पालिकेची पुरेशा कर्मचाऱ्यांअभावी धावपळ उडण्याची शक्यता आहे.