फरार ममता कुलकर्णीच्या घरावर नोटीस, संपत्ती जप्त होण्याची शक्यता

By admin | Published: June 23, 2017 06:44 PM2017-06-23T18:44:12+5:302017-06-23T18:44:12+5:30

दोन हजार कोटी रुपयांच्या इफेड्रिन तस्करी प्रकरणी फरार असलेली अभिनेत्री ममता कुलकर्णीच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.

Notice of absconding Mamta Kulkarni's house, possibility of seizure of property | फरार ममता कुलकर्णीच्या घरावर नोटीस, संपत्ती जप्त होण्याची शक्यता

फरार ममता कुलकर्णीच्या घरावर नोटीस, संपत्ती जप्त होण्याची शक्यता

Next
>ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. 6 - दोन हजार कोटी रुपयांच्या इफेड्रिन तस्करी प्रकरणी फरार असलेली अभिनेत्री ममता कुलकर्णीच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. ठाणे न्यायालयाने 6 जून रोजी ममता कुलकर्णीला फरार घोषीत केल्यानंतर आज तिच्या यारी रोडवरील घरावर ठाणे क्राईम ब्रांचनं नोटीस लावली आहे.  ममता कुलकर्णीला कोर्टासमोर हजर होण्यासाठी 30 दिवसांची मुदत देण्यात आली असून ममता कुलकर्णी हजर राहिली नाही तर तिची संपत्ती जप्त केली जाऊ शकते आणि तिच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीसही बजावली जाऊ शकते.
 
13 एप्रिल 2016 रोजी ठाणे पोलिसांनी ममता कुलकर्णी आणि तिचा पती विकी गोस्वामी यांच्याकडून 12 लाख रुपयांचा इफेड्रिन नावाचा मादक पदार्थ जप्त केला होता. या दोघांच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सोलापूर येथील एव्हॉन लाईफ सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेडच्या फॅक्टरीवर छापा टाकून 2 हजार कोटी रुपयांच्या इफेड्रिनची देश-विदेशात तस्करी करणाऱ्या रॅकेटचा भंडाफोड केला होता. या प्रकरणात ममता कुळकर्णी आणि विकी गोस्वामीचा सहभाग पोलिसांनी न्यायालयासमोर स्पष्ट केल्यानंतर त्यांच्याविरूद्ध तीनवेळा अटक वॉरंट बजावण्यात आले. आरोपींच्या अंधेरी, वरसोवा आणि अहमदाबादेतील ज्ञात निवासस्थानी पोलिसांनी तिन्हीवेळा अटक वॉरंट बजावले. परंतु त्याचा उपयोग झाला नसल्याची माहिती सरकारी पक्षाने न्यायालयास दिली. आरोपींचा ठावठिकाणा लागत नसल्याने त्यांना फरार घोषित करण्यासाठी विशेष सरकारी वकील शिषीर हिरे यांनी मंगळवारी अतिरिक्त सत्र न्यायाधिश एच.एम. पटवर्धन यांच्या अंमली पदार्थ विरोधी विशेष न्यायालयासमोर युक्तिवाद केला. आरोपी केनियामध्ये असण्याची शक्यता असून, वारंवार अटक वॉरंट बजावूनही ते समोर येत नसल्याने त्यांना फरार घोषित करण्याची मागणी अ‍ॅड. हिरे यांनी केली. न्यायालयाने ती मान्य करून ममता कुळकर्णी आणि विकी गोस्वामी यांना फरार घोषित केले. या आदेशामुळे आरोपींच्या चल-अचल मालमत्तेचा शोध घेऊन ती जप्त करण्याची प्रक्रिया पोलिसांना करणे शक्य होणार आहे. याशिवाय आरोपींविरूद्ध रेड कॉर्नर नोटीस बजावण्यासाठी पाठपुरावा करणेही यामुळे शक्य होणार आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी 10 जुलै रोजी होणार आहे. तपास अधिकारी सहायक पोलीस आयुक्त भरत शेळके हेदेखील यावेळी न्यायालयात उपस्थित होते.
 
इफेड्रिन नष्ट करण्यासाठी मागितली परवानगी-
 
वर्षभरापासून पोलिसांच्या जप्तीमध्ये असलेला इफेड्रिनचा साठा नष्ट करण्याची परवानगी सरकारी पक्षाने मंगळवारी न्यायालयास मागितली. सोलापूर येथील एव्हॉन लाईफ सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेडच्या फॅक्टरीमध्ये हा साठा पडून आहे. वर्षभरातून 12 पोलीस या साठ्यावर पहारा ठेऊन आहेत. पोलिसांचे हे मनुष्यबळ अनावश्यक अडकून पडले असल्याचे अ‍ॅड. शिषीर हिरे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. एव्हॉन लाईफ सायन्सेसचे संचालक आणि या प्रकरणातील आरोपी मनोज जैन यांनी यास विरोध दर्शविला. पोलिसांनी कारवाई केली तेव्हा हा साठा निरुपयोगी असल्याचा युक्तिवाद आरोपींनी केला होता. त्यामुळे आता विरोध कशासाठी, असा युक्तिवाद अ‍ॅड. हिरे यांनी केला. याशिवाय मनोज जैन हे सध्या कंपनीचे संचालक नसल्याने त्यांना याबाबत बोलण्याचा अधिकारच नसल्याचेही अ‍ॅड. हिरे यांनी स्पष्ट केले. न्यायालयाने या मुद्यावर 14 जुलै रोजी पुढील सुनावणी ठेवली आहे.
 

Web Title: Notice of absconding Mamta Kulkarni's house, possibility of seizure of property

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.