मीरारोड - मोर्वा येथील श्री राधाकृष्ण मंदिर ट्रस्टने त्यांच्या मालकी जागेतील शागीर्द डेकोरेटर्सने बांधलेल्या अनधिकृत गोदाम व मोबाईल टॉवर वर कारवाईसाठी तक्रारी देऊन सुद्धा महापालिका मात्र केवळ कागदी नोटीस देऊन बेकायदा कामांना संरक्षण देत असल्याचा आरोप ट्रस्टने केला आहे.
भाईंदर पश्चिमेच्या मोर्वा गावातील राधाकृष्ण मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष रमेश पाटील यांनी तक्रार केली आहे की, मंदिराच्या सर्व्हे क्रं. ५९ ह्या जागेवर शागीर्द डेकोरेटर्स चे मालक जगदेव म्हात्रे यांनी अनधिकृत गोडाऊनचे बांधकाम करून, त्यातील चौदा अनधिकृत खोल्यांना पालिका संगनमताने मालमत्ता कर आकारणी करून घेतली आहे. याठिकाणी चालवले जाणारे बियर शॉप हे ट्रस्टच्या हरकतीने बंद करण्यात आले. पालिका अनधिकृत बांधकाम वर कारवाई करत नसताना दुसरीकडे येथील अनधिकृत बांधकामावर इंडस टॉवर लि. कंपनीचा अनधिकृत मोबाईल टॉवर उभारला आहे. सदर टॉवरची नोंद पालिकेच्या दफ्तरी नाही. अनेक वर्षांपासून टॉवरचा कर महापालिकेला भरलेला नाही.
मंदिर ट्रस्टच्या तक्रारीनंतर तत्कालीन प्रभाग अधिकारी संजय दोंदे यांनी २९ एप्रिल रोजी जगदेव म्हात्रे यांना स्वखर्चाने सदर टॉवर व बांधकाम काढुन टाकण्याचे आदेश दिले. अन्यथा महापालिका बांधकाम काढून त्याचा खर्च वसूल करेल तसेच एमआरटीपी खाली गुन्हा दाखल करण्याचा इशारा सुद्धा दिला होता. परंतु जगदेव म्हात्रे हे पालिकेचे बडे ठेकेदार असल्याने पाच महिने व्हायला आले तरी महापालिकेने कोणतीच कारवाई केलेली नाही. पालिकेचे आर्थिक नुकसान होत असताना देखील सदर अनधिकृत बांधकाम व मोबाईल टॉवर ला संरक्षण देण्याचे काम पालिका अधिकारी करत असल्याचा आरोप रमेश पाटील यांनी केला आहे.