- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आयपीएलमधील वानखेडे येथे मंगळवारी झालेल्या सामन्यादरम्यान आवेष्टित वस्तूंवर (सीलबंद) अधिक दर आकारल्याने वैध मापनशास्त्र विभागाने बोर्ड आॅफ कंट्रोल फॉर क्रिकेट इंडिया (बीसीसीआय) व मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) या दोन्ही यंत्रणांना खुलासा करण्याची नोटीस पाठवली आहे. ताकीद देऊनही या ठिकाणी ग्राहकांची लूट होत असल्याचे निदर्शनास आल्याने विभागाने ही नोटीस पाठवल्याचे वैध मापनशास्त्र विभागाचे नियंत्रक अमिताभ गुप्ता यांनी सांगितले. यामध्ये संबंधित यंत्रणा दोषी आढळल्यास ग्राहक न्यायालयात १ कोटी रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद असल्याची माहितीही त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.क्रिकेटच्या सामन्यांदरम्यान ग्राहकांची लूट होण्याची शक्यता व्यक्त करत, विभागाने बीसीसीआयला यासंदर्भात देखरेख करण्यासाठी अनुपालन अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याचे आदेश डिसेंबरमध्ये दिले होते. त्यानंतर मार्च महिन्यात बीसीसीआयने अधिकाऱ्यांची नेमणूक केल्याचे पत्र विभागाला पाठवले होते. मात्र, स्टेडियमवरील स्टॉलधारकांकडून ग्राहकांची लूट होत असल्याच्या तक्रारी विभागाला प्राप्त झाल्या. त्याची दखल घेत, प्रशासनाच्या पथकाने १६ मे रोजीच्या सामन्यवेळी येथील तीन स्टॉलवर कारवाई करत खटले दाखल केले आहेत.गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, वानखेडे मैदानाच्या गरवारे पॅव्हेलियनमधील पहिल्या मजल्यावर मॅग्नेम कँडी आइस्क्रीम ७५ रुपये छापील किंमत असताना, १०० रुपयांना विकले जात होते. तर गावस्कर स्टॅन्डवरील स्टॉल क्रमांक १ व ३ या दोन्ही स्टॉलवर ५५ रुपये किमतीचे कोरनॅटो आइस्क्रीम ६० रुपयांना विकले जात होते. छापील किमतीपेक्षा जास्त दराने आवेष्टित वस्तू विकून ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी कारवाईत आस्थापनांविरोधात खटले दाखल करण्यात आले. शिवाय, स्टेडियममध्ये सीलबंद वस्तूंची विक्री एमआरपीहून जादा दराने होऊ नये, म्हणून बीसीसीआयच्या अनुपालन अधिकाऱ्यांनी काय कार्यवाही केली? याबाबतचा खुलासा सादर करावा, अशी विचारणा बीसीसीआयला विभागाने केली आहे.१ कोटी रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूदमैदानात कोणत्याही प्रकारचे खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास मैदान प्रशासनाकडून मनाई केलेली आहे. त्यामुळे ग्राहकांची लूट होऊ नये, याची काळजी व जबाबदारी घेण्याचे काम हे बीसीसीआय व एमसीएचे होते. त्यासाठी अनुपालन अधिकारी नेमण्याचे आदेश विभागाने दिले होते. मात्र, संबंधित आदेशाचे पालन झाले का? नेमक्या कुणाच्या चुकीमुळे ग्राहकांची लूट झाली? याचा तपास खुलाशानंतर केला जाईल. ग्राहक न्यायालयात जाण्याचा मार्गही विभागासमोर खुला असेल. न्यायालयात ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी १ कोटी रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद असल्याची अधिक माहिती गुप्ता यांनी दिली.अधिक किंमत आकारल्यास तक्रार करा!राज्यातील कोणत्याही मैदानात किंवा दुकानांत सीलबंद वस्तूंवर एमआरपीहून अधिक किंमत आकारल्यासग्राहकांनी वैध मापनशास्त्र विभागाच्या नियंत्रक कक्षास कळवावे. त्यासाठी ग्राहकांनी ०२२-२२६२२०२२ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा dclmms_complaints@yahoo.com या ईमेल आयडीवर तक्रार करावी, असे आवाहन गुप्तायांनी केले आहे.