मुंबई : जुहू येथील रस्त्यालगतच्या बंगल्यांची जागा रुंदीकरणाच्या कामासाठी महापालिका ताब्यात घेणार आहे. मात्र यामध्ये चक्क बिग बी अमिताभ बच्चन आणि उद्योजक के. व्ही. सत्यमूर्ती अशा दिग्गजांच्या बंगल्यांचा समावेश असल्याने ही कारवाई रखडली होती. मात्र नुकतेच सत्यमूर्ती यांच्या निवासस्थानाच्या आवारातील नऊ फूट जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तर अमिताभ यांच्या प्रतीक्षा बंगल्याच्या आवारातील जागा ताब्यात घेण्यासाठी नोटीस पाठविण्यात आली आहे.
जुहूतील संत ज्ञानेश्वर मार्गाच्या रुंदीकरणासाठी जंक्शनवरील या बंगल्यांच्या आवारातील जागांची मागणी पालिकेने केली होती. त्यासाठी संबंधितांना नोटीस पाठविली. परंतु उद्योजक सत्यमूर्ती यांनी न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने स्थगिती आदेश न दिल्यामुळे सत्यमूर्ती रेसिडेन्स या सात मजली इमारतीची संरक्षक भिंत पाडून जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया पालिका राबवणार आहे. अमिताभ बच्चन यांच्या ‘प्रतीक्षा’ बंगल्याच्या आवारातील सहा फूट जागाही रस्ता रुंदीकरणासाठी ताब्यात घ्यावी लागेल. यासाठी पालिकेने बच्चन यांनाही नोटीस पाठविली असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
यासाठी हवीय जागाजुहू येथील एन. एस. रस्ता क्रमांक १० येथून जुहू चंदन चित्रपटगृहाकडून इर्ला उदंचन केंद्राकडे जाणाºया संत ज्ञानेश्वर मार्गावर वाहतूककोंडी होते. यामुळे वाहनचालक, पादचाऱ्यांचीही गैरसोय होते. त्यामुळे पालिकेने ४५ फुटांच्या संत ज्ञानेश्वर मार्गाचे ६० फुटांपर्यंत रुंदीकरण करण्याचा निर्णय घेतला. सत्यमूर्ती निवासस्थानाच्या जागी पूर्वी बंगला होता. बंगल्याच्या पुनर्विकासावेळी रस्त्यासाठी जागा सोडण्याची अट घालण्यात आली होती. ही इमारत जंक्शन परिसरात असल्याने रस्ता ६० फूट रुंद केल्यानंतरही अतिरिक्त जागेची आवश्यकता आहे.