मुंबई : टाटा ट्रस्टचे व्यवस्थापकीय विश्वस्त आर. वेंकटरमनन यांनी सायरस मिस्त्री यांच्याविरुद्ध केलेल्या ५०० कोटी रुपयांच्या मानहानी दाव्याप्रकरणी बजावण्यात आलेले समन्स सत्र न्यायालयाने रद्द केल्याने वेंकटरमनन यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणी उच्च न्यायालयाने सायरस मिस्त्री यांना सोमवारी नोटीस बजावली आहे.मिस्त्री व अन्य जणांविरुद्ध कनिष्ठ न्यायालयाने बजावलेले समन्स २६ डिसेंबर रोजी सत्र न्यायालयाने रद्द केल्याने वेंकटरमनन यांनी सत्र न्यायालयाच्या या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले.न्या. रेवती मोहिते-डेरे यांनी मिस्त्री यांना नोटीस बजावत या याचिकेवरील सुनावणी तीन आठवड्यांनी ठेवली आहे. सत्र न्यायालयाचा आदेश कायद्याच्या दृष्टीने अयोग्य असल्याचे वेंकटरमनन यांनी याचिकेत म्हटले आहे.टाटा ट्रस्टचे व्यवस्थापकीय विश्वस्त वेंकटरमनन यांनी मिस्त्री व अन्य काही जणांनी चुकीची विधाने करून त्यांची बदनामी केल्याचे म्हणत त्यांनी सर्वांविरुद्ध फौजदारी मानहानीचा दावा दाखल केला. तसेच नुकसानभरपाई म्हणून ५०० कोटी रुपये देण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी वेंकटरमनन यांनी दाव्याद्वारे केली आहे.वेंकटरमनन यांच्या म्हणण्यानुसार, मिस्त्री यांनी टाटाच्या संचालकांना व विश्वस्तांना एक ई-मेल पाठविला. या मेलमध्ये मिस्त्री यांनी वेंकटरमनन यांची बदनामी करणारा मजकूर लिहिला आहे.तक्रारीनुसार, टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून सायरस मिस्त्री यांनी २४ आॅक्टोबर २०१६ रोजी राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी ई-मेल करून टाटा समूहाचा एव्हिएशन व्हेंचर, एअर एशिया इंडियामध्ये २२ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे सांगितले आणि या प्रकरणी वेंकटरमनन यांना आरोपीच्या पिंजºयात उभे केले. वेंकटरमनन यांनी यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप मिस्त्री यांनी केला.सक्तवसुली संचालनालय (ईडी) या प्रकरणाचा सध्या तपास करत आहे. मिस्त्री यांचा ई-मेल प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचल्याने आपले कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे, असे वेंकटरमनन यांनी दाव्यात म्हटले आहे.
सायरस मिस्त्रींना हायकोर्टाची नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 4:45 AM