Join us  

‘त्या’ अतिक्रमणांना नोटिसा

By admin | Published: May 26, 2014 4:56 AM

सिडको, महापालिका आणि पोलीस प्रशासनाला वाकुल्या दाखवत उभारण्यात येत असलेल्या जुहूगावातील त्या वादग्रस्त बांधकामांना सिडकोच्या अतिक्रमण विभागाने नोटीसा बजावल्या आहेत.

कमलाकर कांबळे , नवी मुंबई - सिडको, महापालिका आणि पोलीस प्रशासनाला वाकुल्या दाखवत उभारण्यात येत असलेल्या जुहूगावातील त्या वादग्रस्त बांधकामांना सिडकोच्या अतिक्रमण विभागाने नोटीसा बजावल्या आहेत. त्यामुळे येत्या आठवडाभरात या बांधकामांवर कारवाई होण्याची शक्यता या विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. जुहूगावात भूमाफियांनी धुमाकूळ घातला आहे. फिफ्टी-फिफ्टीच्या बांधकामांचे पेव फुटले आहे. येथील केंद्रीय औद्योगिक वसाहतीजवळ जुहूगावाच्या अगदी दर्शनी भागात मागील काही दिवसांपासून एक नवीन अनधिकृत इमारत उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. विशेष म्हणजे सदर भूखंड सिडकोच्या मालकीचा आहे. त्यामुळे या भूखंडाला तारेचे कुंपण घालून तो संरक्षित करण्याचा निर्णय सिडकोने घेतला होता. तसेच सदरहू भूखंडाचे साडेबारा टक्के योजनेअंतर्गत वाटप करण्याची सिडकोची योजना होती. सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालिका व्ही.राधा यांनी तशा आशयाच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या होत्या. असे असतानाही या भूखंडावर मागील काही दिवसांपासून टॉवर उभारण्याचे जोरदार काम सुरू करण्यात आले आहे. यासह येथील बांधकामासंदर्भात लोकमतमधून सविस्तर वृत्त प्रसिध्द करण्यात आले होते. या वृत्ताची दखल घेत सिडकोने या अतिक्रमणाच्या विरोधात आता कंबर कसली आहे. त्यानुसार गेल्या आठवड्यात या बांधकामाला नोटीस बजावून काम थांबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानंतरही काम सुरूच असल्याने लवकरच या बांधकामावर कारवाई करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. अतिक्रमण विभागाचे प्रमुख अनिल पाटील यांनी यास दुजोरा दिला आहे.