काही दिवसांपूर्वी वकील असीम सरोदे यांनी शिवसेनेतील १२ आमदार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे परतणार असल्याच्या दावा केला होता. यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू होत्या. सरोदे यांनी आमदारांची यादीही वाचून दाखवली होती. या प्रकरणी आता शिवसेना शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. वकील असीम सरोदे यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यांनी दोन दिवसात माफी मागितली नाहीतर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे म्हटले आहे.
"आज शिवाजी पार्कवर 'या' पाच गोष्टी ऐकू येणार नाहीत", मिलिंद देवरांचा ठाकरेंना टोला
"उद्धव ठाकरे गटाकडे नेते नसल्यामुळे असे नवीन लोक बोलायला येत आहेत. ते आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी मोठी वक्तव्य करत आहेत.माध्यमांसमोर येण्यासाठी प्रयत्न करत आहेत. काही दिवसापूर्वी त्यांनी नाव वाचून दाखवली. या प्रकरणी आम्ही त्यांना लिगली नोटीस पाठवली आहे. त्यांनी दोन दिवसात माफी मागितली नाहीतर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहे, असा इशारा आमदार संजय शिरसाट यांनी दिला.
वकील असीम सरोदे काय म्हणाले होते?
शिवसेनेतील १२ आमदार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे परतणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत, याबाबत काल वकील असीम सरोदे यांनी एक यादी वाचून दाखवली. यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली.
एका सभेत बोलताना वकील असीम सरोदे यांनी आमदारांची यादी वाचून दाखवली. हे आमदार उद्धव ठाकरे यांच्याकडे परतणार असल्याचा त्यांनी दावा केला आहे. यात आमदार श्रीनिवास वनगा, आमदार लता सोनवणे, महेंद्र दळवी, प्रकाश सर्वे, बालाजी कल्याणकर, चिमणराव पाटील, नितीनकुमार तळे, प्रदीप जैसवाल, उदयसिंह राजपूत, महेश शिंदे, प्रकाश आबिटकर या आमदारांच्या नावांचा समावेश आहे.