Join us

१४ आमदारांना दिली नोटीस, उत्तरासाठी ८ फेब्रुवारीची मुदत; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचाही समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 6:03 AM

शिवसेनेच्या शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र न ठरविण्याच्या नार्वेकर यांच्या निर्णयाला आव्हान दिले आहे.

मुंबई : विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे १४ आमदार यांना उच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र न ठरविण्याच्या नार्वेकर यांच्या निर्णयाला आव्हान दिले आहे. त्यावरील सुनावणीवेळी बुधवारी उच्च न्यायालयाने संबंधितांना नोटीस बजावत उत्तर दाखल करण्यासाठी ८ फेब्रुवारीपर्यंतची मुदत दिली. न्या. गिरीश कुलकर्णी व न्या. फिरदोश पुनीवाला यांच्या खंडपीठाने राज्य विधिमंडळ सचिवालयालाही नोटीस बजावत  उत्तर देण्याचे निर्देश दिले. ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र ठरविण्यासाठी विधिमंडळ अध्यक्षांकडे याचिका केली होती. 

याचिकेत काय म्हटले?गोगावले यांनी याचिकेत म्हटले आहे की, ३ जुलै २०२२ रोजी त्यांनी सर्व शिवसेना आमदारांना ४ जुलै २०२२ रोजी विधानसभेत होणाऱ्या  विश्वासदर्शक ठरावात शिंदे सरकारच्या बाजूने मतदान करण्याचा व्हीप जारी केला होता. परंतु, १४ शिवसेना आमदारांनी केवळ व्हीपचे उल्लंघन केले नाही, तर त्यांनी शिवसेना पक्षाचे सदस्यत्व सोडले. सदस्यत्व सोडण्याशिवाय १४ आमदारांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी करून शिवसेना सरकारविरोधात मतदान केले, ही बाब विचारात घेण्यास नार्वेकर अपयशी ठरले.

टॅग्स :न्यायालयराहुल नार्वेकरएकनाथ शिंदे