मुंबई : वर्सोवा समुद्रकिनारी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून बांधल्या जाणाऱ्या भिंतीसह येथे टाकल्या जाणाऱ्या टेट्रापॉडबाबत पर्यावरण अभ्यासकांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर आता राष्ट्रीय हरित लवादानेही नोटीस बजावली आहे. जेथे कासवे असतात तेथे याप्रकारचे बांधकाम करणे योग्य नसल्याचेही अभ्यासकांनी सांगितले.
सरकारी संस्थांना या प्रकरणात नोटीस देण्यात आली असून, पर्यावरण अभ्यासक झोरू बथेना यांच्यासह पर्यावरण क्षेत्रात काम करत असलेल्या अनेकांनी वर्सोवा समुद्रकिनारी सुरू असलेल्या बांधकामाला व टेट्रापॉड टाकण्याच्या कामाला विरोध दर्शविला होता. शिवाय, वर्सोवा समुद्रकिनारी दाखल होत निषेध व्यक्त केला होता. येथे अशा प्रकारचे काम करण्यात आल्याने पर्यावरणाची म्हणजे समुद्राची मोठी हानी होईल, अशी भीती व्यक्त केली होती.
अशी बांधकामे म्हणजे समुद्राचे संरक्षण नाही तर नुकसान होण्यास कारणीभूत ठरतात. याचा फटका समुद्रातील जीवांना बसतो, असे अनेक मुद्दे कार्यकर्त्यांनी मांडले होते. त्यानंतर येथील बांधकाम थांबविण्यात आले होते. मात्र कार्यकर्ते केवळ यावर थांबले नाहीत तर त्यांनी आपला विरोध कायम ठेवला होता. आता जलचरांना होणारी हानी मोठी असेल, असे म्हणणे सातत्याने कार्यकर्त्यांनी मांडले होते. यावर लवादाने या प्रकरणात नाराजी व्यक्त करत सरकारी संस्थांना नोटीस बजावली आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी २९ सप्टेंबर रोजी होणार आहे.