विकासकामांबाबत माहिती मागवूनही अपवाद वगळता प्रतिसाद नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या विरोधात मंगळवारी हक्कभंगाची सूचना मांडली.
मुंबईतील विकासकामांबाबत वेळोवेळी माहिती मागवूनही आयुक्तांकडून अपवाद वगळता प्रतिसाद मिळाला नाही. पालिका आयुक्तांची ही कृती विधान परिषद सदस्य म्हणून माझा आणि सार्वभौम सभागृहाचा विशेषाधिकार भंग आणि अवमान असल्याचे सांगत दरेकर यांनी हक्कभंग मांडला, तसेच हे प्रकरण चौकशीसाठी विशेषाधिकार समितीकडे पाठवून लवकरात लवकर त्याचा अहवाल सभागृहात सादर करण्याची मागणी विरोधी पक्षनेत्यांनी केली.
विरोधी पक्षनेता म्हणून मुंबई महानगरपालिकेशी संबंधित विविध विकास कामांबाबतची, जनकल्याणविषयक बाबींची माहिती आयुक्तांकडे मागितली. संसदीय कामकाज पार पाडण्यासाठी ही माहिती द्यावी, अशी पत्रे पाठविली. स्मरणपत्रे दिली. मात्र, एखादा अपवाद वगळता माझ्या कोणत्याही पत्रांना उत्तरे देण्यात आलेली नाहीत, तसेच माहितीही पुरविली नाही, असे सांगत दरेकर यांनी ३४ पत्रांचे दाखलेच सभागृहात वाचले. दरेकरांनी या हक्कभंगाच्या सूचनेसोबत मागविलेल्या माहितीचे विषय, तारीख, पत्र क्रमांक आणि पत्र पाठविल्यानंतर झालेला कालावधी याबाबतचा तपशील सोबत दिला.
* संसदीय कामकाजविषयक कर्तव्य बजावण्यात अडसर
जनतेचे प्रश्न मांडताना यंत्रणेच्या त्रुटी सभागृहाच्या माध्यमातून सरकारच्या समोर मांडल्या जातात. घटनाकारांना तेच अपेक्षित असते. मुंबई महानगरपालिकेशी संबंधित विकास कामांबाबतची, जनकल्याणविषयक बाबींबाबतची माहिती उपलब्ध न झाल्यामुळे मला जनतेच्या या प्रश्नांबाबत सभागृहात योग्य, अधिकृत व ठोस भूमिका मांडता आली नाही. माझे संसदीय कामकाजविषयक कर्तव्य बजावता आले नाही. त्यामुळे माझ्या विधिमंडळ कामकाजात अडथळा निर्माण झाला आहे, असा आरोप दरेकर यांनी आपल्या सूचनेतून केला.