- मनोहर कुंभेजकर
मुंबई - आपल्याला मंडप उभारण्यासाठी दिलेली परवानगी ही गणेश मूर्तिकार म्हणून गणपतीच्या मूर्त्या तयार करण्यासाठी दिलेली आहे.मात्र या ठिकाणी पालिकेच्या के पश्चिम विभागाला आपण येथे मूर्तिकार म्हणून गणपतीच्या मूर्त्या तयार करत नसून त्या विकत आहेत. तसेच त्यामुळे आपल्या दिलेल्या मंडपाची परवानगी रद्द करून यावर निष्कासन कारवाई करण्यात येईल अशी नोटीस के पश्चिम वॉर्डचे सहाय्यक पालिका आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी पालिका नियम 1888 कलम 314 अन्वये विलेपार्ले पश्चिम आणि सांताक्रूझ पश्चिम येथील दोन गणेश मंडप धारकांना दिला आहे .तसेच पदपथावर चालण्यासठी जागा देखिल सोडण्यात आलेली नाही. परिणामी या दोन गणेश मंडपवार जारी केलेल्या नोटीसांमुळे शिवसेना संतप्त झाली आहे. काय हे,कसल्या नोटीसा.? फक्त एक महिना भर मराठी तरुणांनी स्वतःचा व्यवसाय करायचा की नाही?काय अडचण आहे पालिका अधिकाऱ्यांना? के पश्चिम विभागात कायमच मोठी मोठी अनधिकृत बांधकामे होतात त्यांच्यावर पालिका प्रशासन काय कारवाई करते असा खडा सवाल भारतीय कामगार सेनेचे चिटणीस जितेंद्र जानावळे यांनी लोकमतशी बोलतांना केला.तर परिणामी या दोन गणेश मंडपवार जारी केलेल्या नोटीसांमुळे शिवसेना आक्रमक झाली आहे.आमदार व विभागप्रमुख अँड.अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली अंधेरी पश्चिम येथील के पश्चिम कार्यालयासमोर रस्त्यावर उतरून महा आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेचे शाखा क्रमांक 84 चे शाखाप्रमुख नितीन डिचोलकर यांनी लोकमतशी बोलतांना दिला.के पूर्व वॉर्डने विलेपार्ले पूर्व येथील गणेश मंडपावर केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ विलेपार्ले विधानसभा मतदार संघातील शिवसेनेच्या 12 शाखांनी केलेल्या अलिकडेच मोठ्या संख्येने रस्त्यावर ऊतरुन केलेल्या महाआरतीची आठवण त्यांनी करून दिली. दरम्यान याबाबतीत के पश्चिम वॉर्डचे सहाय्यक पालिका आयुक्त प्रशांत गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता आम्ही न्यायल्याच्या आधीन राहून या दोन मंडपांना निष्कासन कारवाई करण्याची नोटीस दिली आहे.जर पदपथांवर जर मंडप बांधले तर नागरिकांनी चालायचे कसे ? असा सवाल त्यांनी केला.तसेच पालिका अधिकाऱ्यांनी या दोन मंडपाची पाहणी केली असता हे मंडप धारक हे मूर्तिकार नसून गणेश मूर्त्या विक्रेते आहेत असे आढळून आले अशी माहिती त्यांनी दिली.