मुंबई : जेजे रुग्णालयाच्या आवारात होळी सण साजरा करत असताना, अनुचित प्रकार घडल्याचे जे.जे रुग्णालय अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी सांगितले होते. त्या पार्श्वभूमीवर रुग्णालयात पार पडणाऱ्या महोत्सवात विद्यार्थ्यांवर ड्रेसकोड, वेळेचे बंधन आणि मुला-मुलींना आवारात एकत्र वावरण्याविषयी नियम करण्यात आले होते. याविषयी विद्यार्थ्यांनी आवाज उठविल्यामुळे वैद्यकीय शिक्षण संशोधन व संचालनालयाने अधिष्ठाता डॉ. चंदनवाले यांच्या चौकशीचे आदेश दिले होते. चौकशीअंती या ‘नियमावली’विषयी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने (डीएमईआर) डॉ. चंदनवाले यांना नोटीस पाठविली.काही दिवसांपूर्वी डॉ. चंदनवाले यांच्या चौकशीकरिता संचालनालयाने त्रिसदस्यीय समितीची नेमणूक केली होती. या समितीने शनिवारी अहवाल सादर केल्यानंतर, डीएमईआरने जेजे रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना नोटीस पाठविली. याविषयी, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांवर लादलेले नियम चुकीचे आहेत. याऐवजी त्यांच्याशी संवाद साधला, तर शिस्त राखणे सोपे जाईल. या प्रकरणी डॉ. शिल्पा पाटील यांच्यावरही समितीने कारवाई केली असून, त्यांची बदली करण्यात आली आहे. याविषयीडॉ. चंदनवाले यांची प्रतिक्रिया जाणून घ्यायचा प्रयत्न केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
जेजे रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 6:34 AM