Join us  

महापालिकेने कपिल शर्माला अगोदरच बजावली होती नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2016 2:37 PM

कॉमेडी किंग कपिल शर्माने ज्या बांधकामासाठी लाच मागितली असल्याचा आरोप केला आहे ते बांधकाम अवैध होतं आणि त्यासंबंधी नोटीसदेखील पाठवली होती अशी माहिती महापालिकेने दिली आहे

- ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 9 - आपल्या कार्यालयाच्या बांधकामासाठी महापालिकेने पाच लाखांची लाच मागितली असल्याचा आरोप करणा-या कॉमेडी किंग कपिल शर्माचा वार त्याच्यावर उलटताना दिसत आहे. ज्या बांधकामासाठी लाच मागितली असल्याचा आरोप कपिल शर्माने केला आहे ते बांधकाम अवैध होतं, आणि त्यासंबंधी 16 जुलै 2016 रोजी नोटीसदेखील पाठवली होती अशी माहिती महापालिकेने दिली आहे. 
 
या नोटीसमध्ये कपिल शर्माला बांधकाम तात्काळ थांबवण्याचे आदेश देण्यात आले होते. या नोटीसची एक प्रत वर्सोवा पोलिसांकडे पाठवण्यात आली होती. महापालिकेने दिलेल्या माहितीमुळे तक्रार करुन कपिल शर्माने आपल्याच अडचणी वाढवल्याचं दिसत आहे. स्थानिक सामाजिक कार्यकर्ते राजेश मुदगल यांनीदेखील कपिल शर्माच्या ऑफिसचं बांधकामच अवैध असल्याचा दावा केला आहे. वर्सोव्यामध्ये या ऑफिसचं बांधकाम सुरु आहे. 
 
 
महापालिकेने आपल्याकडे लाच मागितल्याचा आरोप कपिल शर्माने केला आहे. कपिल शर्माने स्वत: ट्विटरच्या माध्यमातून महापालिकेने लाच मागितल्याचा आरोप केला असून याची तक्रार पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे करत हेच का तुमचे अच्छे दिन ? असा सवाल विचारत नाराजी व्यक्त केली आहे. 
(VIDEO : कपिल शर्माच्या मुखवट्याआडून नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल)
 
'मी गेली 5 वर्ष न चुकता 15 कोटींचा आयकर भरत असतानाही माझ्या कार्यालयासाठी महापालिकेला 5 लाखांची लाच द्यावी लागते, हेच का तुमचे अच्छे दिन ?', असं ट्विट कपिल शर्माने सकाळी केलं होतं. 
कपिल शर्माच्या ट्विटनंतर विरोधकांना आयता मुद्दा सापडल्याने त्यांनी महापालिकेच्या कारभारावर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली.
 
(कपिल शर्माकडे महापालिकेने मागितली 5 लाखांची लाच ?)
 
ट्विटनंतर महापालिकेने कपिल शर्माला तक्रार नोंद करण्यासाठी सांगितलं असून ज्या व्यक्तीने लाच मागितली त्याचं नाव उघड करण्याची मागणी केली आहे. सोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील या प्रकरणाची दखल घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी कडक कारवाई करु असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलले आहेत.
 
कपिल शर्माचा बोलवता धनी कोण आहे ? आरोपात कॉमेडी आहे का ते पाहावं लागेल, शिवसेनेचं नाव घेतलं असेल तर आमच्या स्टाईलने उत्तर देऊ अशी धमकीच शिवसेनेने देऊन टाकली आहे.