मनोज गडनीस, मुंबई : परदेशातून मुंबईत दाखल झाल्यानंतर एका वृद्ध व्यक्तीला व्हीलचेअर न मिळाल्यामुळे त्याला चालत जावे लागले अन् त्यात त्यांचा मृत्य झाल्याच्या प्रकरणाची आता राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने देखील स्वतःहून गंभीर दखल घेतली असून या प्रकरणी आयोगाने नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाला (डीजीसीए) नोटिस जारी केली आहे.
तसेच, आगामी चार आठवड्यामध्ये या प्रकरणी खुलासा करण्याचे निर्देश दिले आहेत. संबंधित वृद्ध व्यक्तीच्या मृत्यूची घटना १२ फेब्रुवारी रोजी घडली होती. त्यानंतर, या प्रकरणी डीजीसीएने एअर इंडिया कंपनीला १७ फेब्रुवारी रोजी कारणे दाखवा नोटिस जारी केली होती.व्हीलचेअर अभावी वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे वृत्त आम्हाला माध्यमातून समजले असून हे जर खरे असेल तर हे मानवी अधिकारांचे उल्लंघन आहे, असे नमूद करत या प्रकरणी डीजीसीएने खुलासा करतानाच सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने डीजीसीएला दिले आहेत.