Join us

चंद्रकांत पाटील यांना महिला आयोगाची नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2022 7:18 AM

दोन दिवसांत खुलासा करण्याचे निर्देश

मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना राज्य महिला आयोगाने नोटीस बजावली आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबत दोन दिवसांत लेखी खुलासा करण्याचे निर्देश आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दिले आहेत.भाजपच्या ओबीसी आंदोलनावेळी माध्यमांशी बोलताना पाटील यांनी सुप्रिया सुळे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याचे या नोटिसीत म्हटले आहे. यासंदर्भात पुणे शहर लीगल सेलचे असीम सरोदे आणि सहकाऱ्यांनी महिला आयोगाकडे तक्रार अर्ज केला होता. त्या आधारे महिला आयोगाने पाटील यांना नोटीस बजावली आहे.

महिला आज स्वकर्तृत्वावर शिक्षण, व्यवसाय, समाजकारण व राजकारणासह सर्व क्षेत्रात अग्रेसर आहेत. चंद्रकांत पाटील यांनी केलेले वक्तव्य समस्त महिला वर्गाच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचविणारे आहे. एका लोकप्रतिनिधीकडून असे वक्तव्य होणे, ही खेदाची बाब आहे. यापुढे महिलांचा सन्मान राखला जाईल, याचे भान पाटील यांनी राखावे. तसेच केलेल्या वक्तव्याबाबत लेखी खुलासा राज्य महिला आयोगास सादर करावे, असे या नोटिसीत म्हटले आहे.

विधानसभेत सर्वाधिक महिला आमदार भाजपच्या आहेत. ज्यांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला, त्यांनी ग्रामीण भागामध्ये थोडे रहायला शिकावे. माझ्या वक्तव्याचा जो पराचा कावळा केला गेला, त्यावर सुप्रिया सुळे यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. मी कधीही कोणत्याही स्त्रीचा अनादर केलेला नाही आणि भाजपचे तसे संस्कारही नाहीत. - चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष

टॅग्स :चंद्रकांत पाटीलमहिलासुप्रिया सुळे