मुंबई : वन विभाग आणि दुर्ग संवर्धन विभागाच्या मदतीने राज्यातील गडकिल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी ‘जागर दुर्ग इतिहासाचा’ उपक्रम सह्याद्री प्रतिष्ठानने सुरू केला आहे. मात्र सह्याद्री प्रतिष्ठानने गोरखगड, सिद्धगड (मुरबाड), प्रबळगड (पनवेल) अशा काही किल्ल्यांवर लावलेले फलक काही समाजकंटकांनी काढून फेकून दिल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत वन विभागाने गुन्हा दाखल केला असून समाजकंटकांचा शोध घेणे सुरू आहे.याबाबत सह्याद्री प्रतिष्ठानचे दुर्ग संवर्धन विभागाचे अध्यक्ष गणेश रघुवीर यांनी सांगितले की, अशा प्रकारामुळे खचून न जाता सर्व किल्ल्यांवर वन विभागासोबत संयुक्त विद्यमाने पुन्हा फलक बसवण्यात येतील. जागर दुर्ग इतिहासाचा या उपक्रमांतर्गत विविध किल्ल्यांवर दिशादर्शक, स्थळदर्शक आणि सूचना फलक लावण्याचे काम सह्याद्री प्रतिष्ठान करत आहे.या सर्व मोहिमांमध्ये वन विभाग, राज्य पुरातत्त्व व केंद्र पुरातत्त्व विभागाचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. मात्र गड-किल्ल्यांवर फलकांची नासधूस करणाऱ्याविरोधात कारवाई करून इतर समाजकंटाकांना जरब बसवण्याचे काम आता वन विभागाने हाती घेतले आहे. यासंदर्भात स्थानिक पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाला आहे. सध्या या समाजकंटकांचा शोध सुरू आहे. वन विभागाच्या डहाणू युनिटने या घटनेची गंभीर दखल घेतली असून असे प्रकार वन विभाग अंतर्गातील परिसरातील किल्ल्यांवर होऊ नयेत, म्हणून कारवाई होईल, असे आश्वासन देण्यात आले आहे.
गडकिल्ल्यांवरील सूचना फलक तोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2018 5:53 AM