Join us  

पोईसरच्या पुरातन लेडी रेमिडी चर्चला नोटीस

By admin | Published: May 21, 2016 2:03 AM

कांदिवली (प.) पोईसर डेपोसमोरील १५५० साली बांधण्यात आलेल्या लेडी रेमिडी चर्चच्या क्रॉसवर आणि येथील दफनभूमीवर पालिकेच्या पी (दक्षिण) विभागाने हातोडा मारण्याची नोटीस जारी केली

मनोहर कुंभेजकर,

मुंबई- कांदिवली (प.) पोईसर डेपोसमोरील १५५० साली बांधण्यात आलेल्या लेडी रेमिडी चर्चच्या क्रॉसवर आणि येथील दफनभूमीवर पालिकेच्या पी (दक्षिण) विभागाने हातोडा मारण्याची नोटीस जारी केली आहे. पालिकेला या ठिकाणी रस्ता करायचा आहे. त्यामुळे पश्चिम उपनगरातील ख्रिस्ती बांधवांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. याविरुद्ध सुमारे ५ हजारहून अधिक ख्रिस्ती बांधव रविवार, २२ मार्च रोजी सकाळी १० ते १२ दरम्यान चर्चच्या बाहेर मानवी साखळी करून पालिकेविरुद्ध रोष व्यक्त करणार आहेत.गार्डियन्स युनायटेड या संस्थेचे रॅम्सी रिबेलो यांनी या आंदोलनाची हाक दिली आहे. ‘सेव्ह अवर लॅन्ड’च्या डॉल्फी डिसोझा, गर्ग परेरा, स्टॅन्ली फर्नांडिस, ‘वॉच डॉग फाउंडेशन’चे संचालक अ‍ॅड. ग्रॉडफे पिमेंटा आणि निकोलस अल्मेडा, द बॉम्बे ईस्ट इंडियन असोसिएशनचे ब्रायन परेरा आणि अनेक संस्था या आंदोलनात सहभागी होणार आहेत.येथे उभ्या राहत असलेल्या ३२ मजली इमारतीच्या अप्रोच रोडसाठी पालिकेतर्फे येथील पुरातन क्रॉससह दफन भूमीवर हातोडा मारण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप डॉल्फी डिसोझा आणि अ‍ॅड. ग्रॉडफे पिमेंटा यांनी केला. केला. ग्रेड -२ पुरातन वास्तूवर पालिका कोणत्या आधारावर हातोडा मारू शकते, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. असे झाल्यास येथील अंत्यसंस्कारासाठी ५० टक्के जागा उरेल, अशी माहितीही त्यांनी दिली. पालिकेने येथील कर्मचारी वर्गाची चाळ या वर्षी २३ फेब्रुवारीला तोडली होती. या चर्च आवारात ख्रिस्ती बांधवांवर दफनविधी झालेले असल्याने आमच्या भावना तीव्र असल्याचेही रहिवाशांचे म्हणणे आहे. या प्रकरणी पी (दक्षिण) विभागाचे सहायक पालिका आयुक्त साहेबराव गायकवाड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, मिटिंगमध्ये व्यस्त असल्याचे सांगत त्यांनी अधिक बोलण्यास नकार दिला.