Join us

भाडे थकविणाऱ्यांना नोटीस

By admin | Published: October 10, 2015 2:11 AM

म्हाडाच्या संक्रमण शिबिरांचे भाडे थकविणाऱ्या बिल्डरांना मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने कारवाईच्या नोटीस पाठविल्या आहेत. बिल्डरांनी थकित भाडे न भरल्यास त्यांची मालमत्ता

मुंबई : म्हाडाच्या संक्रमण शिबिरांचे भाडे थकविणाऱ्या बिल्डरांना मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने कारवाईच्या नोटीस पाठविल्या आहेत. बिल्डरांनी थकित भाडे न भरल्यास त्यांची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई करण्यात येईल, असा इशारा मंडळाने बिल्डरांना दिला आहे. त्यामुळे बिल्डरांचे धाबे दणाणले आहे.म्हाडाची शहर आणि उपनगरात ५६ संक्रमण शिबीरे आहेत. त्यामध्ये सुमारे २० हजार घरे आहेत. मुंबईतील जुन्या सेस प्राप्त इमारतींचा पुनर्विकास आणि एसआरए योजना राबविणाऱ्या बिल्डरांना या संक्रमण शिबिरातील घरे भाडेतत्वावर देण्यात येतात. त्यानुसार बिल्डरांनी सुमारे १ हजार १२४ घरे म्हाडाकडून घेतली आहेत. या घरांचे तब्बल ५0 कोटी भाडे अनेक वर्षांपासून बिल्डरांनी थकविले आहे. तसेच पुनर्वसन प्रकल्प पूर्ण केल्यानंतरही म्हाडाला संक्रमण शिबीराचा ताबा दिलेला नाही. या बिल्डरांवर म्हाडा कोणतीच कारवाई करत नसल्याने म्हाडा वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत होते. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करताच मंडळाने भाडे थकविणाऱ्या बिल्डरांना नोटीस पाठविल्या आहेत.यापूर्वीही भाडे थकविणाऱ्या बिल्डरांवर म्हाडाने कारवाई केली होती.बिल्डरांचे बँक खातेही सील केले होते. पण बिल्डराच्या या खात्यांमध्ये १ लाख रुपयांपर्यंतची रक्कम असल्याचे समोर आले होते. म्हाडाने कारवाई केल्यानंतर त्याचा पाठपुरावा न केल्याने थकित भाडे वसूल करण्याची कारवाई ठप्प झाली होती. अखेर मंडळाने संक्रमण शिबिरांचे भाडे वसूल करण्याची मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेनुसार बिल्डरांना नोटीस पाठविण्यात आल्या आहेत. या नोटीसीला बिल्डरांकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यास त्यांची बँक खाते, मालमत्ता जप्त करणार असल्याचे मंडळातील अधिकाऱ्याने सांगितले. (प्रतिनिधी)