मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने शिवसेना आमदारांच्या अपात्रेचा निकाल विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. तसेच, लवकरच यासंदर्भात निर्णय घेण्याचेही न्यायालयाने सूचवल होते. त्यातच, शिंदे सरकार बेकायदेशीर असून जर वेळेत निर्णय घेतला नाही तर पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे अनिल परब यांनी माध्यमांना सांगितले. त्यामुळे, सर्वांच्या नजरा या विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे लागल्या आहेत. शिवसेना ठाकरे गटाकडून सातत्याने विधानसभा अध्यक्षांकडे याबाबत निर्णय घेण्याची मागणी होत आहे. आता, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर अॅक्शन मोडमध्ये आले आहेत.
शिवसेनेतील वाद आणि सत्तासंघर्षावर निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांचा अधिकार असल्याचे सांगत १६ आमदारांना अपात्र करण्याचा निर्णय घेण्याचे त्यांना सूचित केले आहे. त्यावर, आता कार्यवाहीला सुरुवात झाल्याचे दिसून येते. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह त्यांच्या गटातील एकूण १६ आमदारांना नोटीस पाठवली असून पुढील ७ दिवसांत निर्णय देण्याचं बजावलं आहे.
दरम्यान, अद्याप राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांचं खातेवाटप झालेलं नाही. अजित पवार हे अर्थ खात्यासाठी आग्रही असल्याचे समजते, पण शिंदे गटाकडून अर्थ खाते राष्ट्रवादीला देण्यास विरोध होत असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे.