Join us

मराठी फलक न लावणाऱ्या ५२२ दुकानदारांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2022 7:12 AM

पहिल्याच दिवशी पालिकेकडून २ हजार १५८ दुकानांची झाडाझडती

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मराठी पाट्या लावण्याबाबत सांगूनही अनेक दुकानदारांनी अद्याप या पाट्या बदललेल्या नाहीत. त्यामुळे पालिकेने मंगळवारपासून मुंबईतील दुकानांची तपासणी सुरू केली असून, पहिल्याच दिवशी २ हजार १५८ दुकानांची झाडाझडती घेण्यात आली. त्यावेळी ५२२ जणांनी मराठी पाट्या न लावल्याने त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे संबंधितांना पुढील आठवडाभरात दुकानाबाहेर मराठी पाट्या बसवाव्या लागणार असून, पाट्या बदलल्या नाहीत तर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.मराठी भाषेतून ठळक अक्षरात नामफलक लावणे बंधनकारक आहे. याबाबत दुकानदारांना प्रशासनाकडून  प्रथम ३१ जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र व्यापारी संघटनांनी कोरोनाचे कारण पुढे करत तीनवेळा मुदत वाढवून घेतली. ही अंतिम मुदत ३० सप्टेंबर रोजी संपल्याने पालिकेने कारवाईला सुरुवात केली. त्यावेळी व्यापाऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने त्यांना दिलासा देण्यास नकार दिल्याने व्यापारी संघटनांनी पालिकेच्या कारवाईच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयातही धाव घेतली. मात्र कारवाई थांबविण्याबाबत न्यायालयाकडून पालिकेला कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत त्यामुळे प्रशासनाने १० ऑक्टोबरपासून  मुंबईतील २४ वॉर्डमध्ये कारवाईला सुरुवात केली.

१ हजार ६३६ ठिकाणी मराठी पाट्यापालिकेने सुरू केलेल्या कारवाईत पहिल्याच दिवशी २ हजार १५८ दुकानांना व आस्थापनांना भेटी दिल्या. यामध्ये पाहणी केलेल्या १ हजार ६३६  दुकानांवर मराठी नामफलक ठळक अक्षरात असल्याचे निदर्शनास आले. हे प्रमाण ७५ टक्के इतके असून अजूनही मराठी नामफलक न लावणाऱ्या संबंधित दुकानदारांनी तातडीने नामफलक बसवावेत व पालिकेला सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मराठी पाट्या नसतील तर प्रत्येक कर्मचाऱ्यांमागे २ हजाराचा दंड भरावा लागणार आहे. टाळाटाळ करणाऱ्या दुकानदारांवर दंडाधिकारी न्यायालयात खटला दाखल केला जाणार आहे.

महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) सुधारणा अधिनियम २०२२ तील कलम ३६ ‘क’ (१) च्या कलम ६ अन्वये नोंदणी केलेल्या प्रत्येक दुकान-आस्थापनाला लागू असलेल्या कलम ७ नुसार मराठी पाट्या दुकानांवर असणे बंधनकारक आहे.