लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या हे मंत्रालयातील फायली तपासत असल्याचा फोटो व्हायरल झाल्याने भाजप विरुद्ध महाविकास आघाडीत आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या झडू लागल्या आहेत. या प्रकरणी सरकारने नगरविकास विभागाच्या तीन अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे. तर, या अक्कलशून्य सरकारने संपूर्ण लोकशाहीच पायदळी तुडवल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
मंत्रालयात नगरविकास विभागात एका खुर्चीवर बसून किरीट सोमय्या हे शासकीय कागदपत्रे चाळत असल्याचा फोटो व्हायरल झाला. त्यानंतर काँग्रेस सरचिटणीस सचिन सावंत यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली. सत्ता गेल्यापासून भाजप नेते बेफाम झाल्याचा आरोपही सावंत यांनी केला. मंत्रालयात शासकीय कर्मचाऱ्यांच्या खुर्चीवर बसून फाइल तपासण्याचे फोटो कोणी काढले, व्हायरल कसे झाले याबाबत नोटीस बजावण्यात आली.राज्य सरकारने काढलेल्या नोटिसीवर देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. मविआ सरकारचे डोके ठिकाणावर आहे का, माहिती अधिकारात फाइलचे निरीक्षण करण्यासाठी गेले तर त्यासाठी थेट माहिती मागणाऱ्यालाच नोटीस ! या अक्कलशून्य सरकारने संपूर्ण लोकशाहीच पायदळी तुडविली आहे. किरीट सोमय्यांना नोटीस कसली देता, ही नोटीस द्यायला सांगणाऱ्या बोलवित्या धन्यावर कारवाई करा, असे ट्विट फडणवीस यांनी केले.मंत्रालयातील प्रत्येक विभागात सीसीटीव्ही आहेत. हे फोटो कुणी काढले हे जरी शोधले तरी ते प्रसारित कुणी केले, हे सहज स्पष्ट होईल, असेही फडणवीस म्हणाले.