लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबई उपनगर जिल्ह्यातील ४ लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रक्रिया सुरळीत व्हावी म्हणून निवडणूक विभागाकडून तयारी सुरू आहे. निवडणुकीच्या कामासाठी लागणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवडणूक विभागाकडून प्रशिक्षण दिले जात आहे; मात्र या प्रशिक्षणाला मुंबई उपनगर जिल्ह्यातील तब्बल तीन हजार कर्मचाऱ्यांनी दांडी मारली.
निवडणूक आयोगाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मुंबईतील मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक आयोगाकडून ४२ हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानुसार निवडणूक विभागाकडून या मतदारसंघातील नियोजन केले आहे. या कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाला १ एप्रिलपासून सुरुवात झाली. १५ एप्रिलपर्यंत विविध विधानसभा मतदारसंघांत प्रशिक्षण शिबिरे घेण्यात आली. त्यामध्ये ईव्हीएमचा वापर, निवडणुकीचे नियम, कायदे आणि कार्यपद्धती आदींचे प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना देण्यात आले; मात्र तीन हजार कर्मचारी प्रशिक्षणाला गैरहजर राहिले. आता या कर्मचाऱ्यांना शनिवारी प्रशिक्षणाची संधी देण्यात आली आहे; मात्र त्यांनी पुन्हा दांडी मारल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल. त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले जातील, अशी माहिती मुंबई उपनगर जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी सतीश बागल यांनी दिली.