लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे रद्द झालेल्या देश-विदेशांतील सहलींचा परतावा नाकारणाऱ्या पर्यटन कंपन्यांना केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने नोटिसा बजावल्या आहेत. यात केसरी, मँगो, नीम, मेकमाय ट्रिप, थॉमस कुक या आस्थापनांचा समावेश आहे.
मुंबई ग्राहक पंचायतीने या पर्यटन कंपन्यांविरुद्ध केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. पर्यटन कंपन्या रद्द झालेल्या सहलींचा संपूर्ण परतावा देण्यास नकार देत असून, ग्राहकांनी भविष्यातील सहलीत सहभागी होण्याची सक्ती केली जात आहे. भविष्यातील सहलीत सहभागी होताना सुद्धा ग्राहकांनी आधी भरलेल्या रकमेतून १५ ते ३० हजार रुपये कापून घेतले जातील, अशी अटही घातली जात असल्याचे ग्राहक पंचायतीने पुराव्यासहित निदर्शनास आणून दिले. त्यानंतर केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने संबंधित कंपन्यांना नोटिसा बजावल्या आहेत.
सहली रद्द होण्यास पर्यटक, ग्राहक कोणत्याही प्रकारे जबाबदार नसल्याने संपूर्ण परतावा मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. ज्या सहलींमध्ये परदेशी व्हिसा घेतला गेला असेल तिथे ती रक्कम कापून घेण्यास कोणाचीच हरकत नसावी. परंतु, याव्यतिरिक्त कोणतीही रक्कम कापून घेणे बेकायदेशीर आहे. केंद्रीय प्राधिकरणाने या सर्व पर्यटन कंपन्यांना रद्द झालेल्या सहलींचा संपूर्ण परतावा देण्याचे आदेश द्यावेत, अशी स्पष्ट मागणी मुंबई ग्राहक पंचायतीने केली आहे. शिवाय पर्यटन कंपन्यांच्या या मनमानी, जाचक अटींवर तीव्र आक्षेप घेत त्या बेकायदेशीर आणि रद्द घोषित करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या प्रकरणी पर्यटन कंपन्यांची भूमिका ऐकून घेतल्यानंतर केंद्रीय ग्राहक प्राधिकरण अंतिम निकाल देणार आहे.
.........
किती पैसे अडकले?
- मुंबई ग्राहक पंचायतीने केलेल्या सर्वेक्षणानुसार, आघाडीच्या सहा पर्यटन कंपन्यांकडे ग्राहकांची ५० कोटी रुपयांहून अधिक रक्कम अडकली आहे. त्यातील ७५ टक्के रक्कम आंतरराष्ट्रीय सहलींकरिता भरण्यात आली होती.
- बऱ्याच ग्राहकांचे दोन ते तीन लाख रुपये अडकून पडले आहेत. मध्यंतरीच्या काळात अनेकांचा रोजगार गेल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे.