मुंबई : महापालिकेच्या ‘डी’ विभागातील ग्रॅन्ट रोड व चर्नी रोड स्थानक परिसरातील धोकादायक इमारतींच्या मालकांना नोटिसा बजावण्यात येणार आहेत. याद्वारे योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना इमारत आणि कारखाने विभागाला उपायुक्त डॉ. संगीता हसनाळे यांनी दिल्या आहेत.
रेल्वे रूळांलगत असलेल्या सांडपाणी वाहिन्यांची स्वच्छता करून परिसरातील कचरा, राडारोडा उचलावा जेणेकरून पाणी वाहण्यास अडथळा होणार नाही, अशाही सूचना त्यांनी पालिका अधिकाऱ्यांना रविवारी दिल्या. पावसाळ्यात गैरसोय होऊ नये म्हणून पालिका प्रशासन विविध उपाययोजना करत असून, यंदा देखील पावसाळापूर्व कामांचा निपटारा करण्यासाठी पालिका प्रशासन कामे करत आहे. पावसाळापूर्व बैठकीत आयुक्त भूषण गगराणी यांनी पश्चिम रेल्वे मार्गावरील मुंबई सेंट्रल, चर्नी रोड व ग्रँटरोड तसेच मध्य रेल्वे मार्गावरील सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकाबाबत काही मुद्दे रेल्वे प्रशासनाने या बैठकीत उपस्थित केले होते.
या पार्श्वभूमीवर उपायुक्त डॉ. संगीता हसनाळे यांनी रेल्वे स्थानकांची पाहणी केली. या पाहणी दौऱ्यादरम्यान ३१ मे २०२४ पूर्वी पावसाळापूर्व कामे पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे, अशा सूचना संबंधित खात्यांना डॉ. हसनाळे यांनी दिल्या.
१) पालिकेतर्फे दरवर्षी पावसाळ्यापूर्वी जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींची पाहणी करण्यात येते. इमारतींचे अतिधोकादायक, धोकादायक व दुरुस्ती योग्य असे वर्गीकरण केले जाते.
२) धोकादायक म्हणून जाहीर झालेल्या इमारतींचे रहिवासी आणि पालिका स्ट्रक्चरल ऑडिट करतात. अनेकदा पालिकेने केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये इमारत तातडीने रिकामी करण्याची सूचना केली जाते; त्यामुळे या परिसरातून धोकादायक इमारतींना नोटिसा देण्यात येणार आहेत.