मुंबई : रॅगिंगच्या छळाला कंटाळून डॉ. पायल तडवी या विद्यार्थिनीने केलेल्या आत्महत्येची राज्य महिला आयोगानेही गंभीर दखल घेतली आहे. संपूर्ण प्रकरणाबाबत सात दिवसांत अहवाल सादर करण्याची नोटीसच आयोगाने रुग्णालयाच्या अधिष्ठातांना बजावली आहे. आपल्या रुग्णालयात व त्याच्याशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांमध्ये रॅगिंगविरोधी कायद्याची अंमलबजावणी होते का, असा थेट प्रश्नच आयोगाने या नोटिशीत विचारला आहे.पायलच्या आत्महत्येमुळे विद्यार्थी व वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये सुसंवाद नसल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी; तसेच यापुढे रॅगिंगविरोधी कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी कोणती पावले उचलणार आहात, याचा सविस्तर अहवाल येत्या आठ दिवसांत राज्य महिला आयोगाकडे सादर करावा, असेही नोटिशीत बजावले आहे.विभागप्रमुखांना निलंबित कराविद्यार्थी संघटनांनीदेखील आक्रमक पवित्रा घेतला आहे. एका हुशार डॉक्टर विद्यार्थिनीने आत्महत्या करणे ही केवळ तिच्या कुटुंबासाठीच नव्हे तर संपूर्ण समाजासाठीच दु:खद घटना असल्याची भावना व्यक्त करत अभाविपच्या शिष्टमंडळाने आज नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश धर्माल व पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांची भेट घेत त्यांना आपले निवेदन सादर केले. चौकशी समिती बनवून पायल तडवी आत्महत्या प्रकरणी दोषी असलेल्या लोकांवर तातडीने कारवाई व्हावी. नायर रुग्णालयाच्या प्रसूती व महिला रोग विभागप्रमुखांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली.दोषींना तत्काळ अटक करून निश्चित वेळेत चौकशी पूर्ण करून या प्रकरणी न्याय मिळावा, वैद्यकीय महाविद्यालयाच्या व हॉस्पिटलच्या संबंधित अधिकाºयावर कारवाई करावी. छळवणूक, जात-जमातीच्या नावाखाली भेदभावाच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारवी. यूजीसीच्या शिफारसीनुसार समान संधी सेल तयार कराव्यात, या मागण्या संघटनांनी केल्या आहेत.>आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्याची विरोधी पक्षनेत्यांची मागणीपायल तडवीच्या आत्महत्येला पाच दिवस उलटूनही अद्याप कोणावरही कारवाई झालेली नाही. याची गंभीर दखल घेऊन या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी व त्याचा अहवाल सर्वपक्षीय गटनेत्यांसमोर ठेवावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे.नायर रूग्णालय परिसरात मंगळवारी सकाळी ११ वाजता विविध संघटनांनी मोर्चा काढण्याचे ठरविले आहे. यावेळी पायलयी आई आबेदा व वडील सलीम तडवी, पती सलमान तडवी उपस्थित राहणार आहेत.नायर रुग्णालयात काही वैद्यकीय विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू दिले नव्हते. गेल्या वर्षी राजेश मारू या रुग्णाचा एमआरआय मशीनमध्ये अडकून मृत्यू झाला होता. यामुळे नायर रुग्णालयातील भोंगळ कारभाराबाबत नाराजी व्यक्त होत आहे. या रॅगिंगबाबत डॉ. तडवी यांनी नायर प्रशासनाकडे तक्रार केली होती. मात्र याची कोणतीही दखल घेण्यात आली नाही. तडवी यांच्या मृत्यूनंतरही प्रशासनाने संबंधित तीन डॉक्टरांवर कारवाई केलेली नाही, असा आरोप रवी राजा यांनी केला आहे. आयुक्त प्रवीण परदेशी यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. तसेच या चौकशीचा अहवाल गटनेत्यांपुढे सादर करण्याची विनंती विरोधकांनी केली आहे.>अँटी रॅगिंग कमिटी अहवाल आज देणारपायल तडवी या विद्यार्थी डॉक्टरने आत्महत्या केल्याप्रकरणी सादर होणारा अँटी रॅगिंग कमिटीचा अहवाल मंगळवारी सादर होण्याची माहिती मार्डकडून जारी केलेल्या प्रसिद्धिपत्रकात देण्यात आली आहे.हा अहवाल २७ मे रोजी जाहीर होणार होता; मात्र तो सादर होऊ न शकल्याने तो २८ मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे. दरम्यान, अहवालाविषयी कोणतीही माहिती मिळाल्यास त्यावर विश्वास न ठेवण्याचे आवाहन मार्डकडून करण्यात आले आहे.या प्रकरणाविरोधात तत्काळ कारवाई न करणाºया आणि तक्रारींकडे दुर्लक्ष करणाºया टोपीवाला वैद्यकीय महाविद्यालयाचा निषेध म्हणून एसएफआय, डीवायएफआय, जनवादी महिला संघटना व जाती अंत संघर्ष समिती या संघटनांनी नायर रुग्णालयासमोर निदर्शने केली.नायर हॉस्पिटलच्या डॉ. पायल तडवी यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
नायर रुग्णालयाच्या अधिष्ठातांना महिला आयोगाची नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 5:04 AM