गणेश मंडळांना नोटिसा

By admin | Published: September 11, 2014 12:16 AM2014-09-11T00:16:04+5:302014-09-11T00:16:04+5:30

पर्यावरणाभिमुख गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या ठाणेकरांनी मात्र डीजे आणि बॅण्जोचा दणदणाट करून ध्वनिप्रदूषणाची वरची पातळी गाठल्याचे पोलिसांच्या पाहणीत स्पष्ट झाले आहे.

Notices to Ganesh Mandals | गणेश मंडळांना नोटिसा

गणेश मंडळांना नोटिसा

Next

ठाणे : पर्यावरणाभिमुख गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या ठाणेकरांनी मात्र डीजे आणि बॅण्जोचा दणदणाट करून ध्वनिप्रदूषणाची वरची पातळी गाठल्याचे पोलिसांच्या पाहणीत स्पष्ट झाले आहे. यानुसार, ठाणे आयुक्तालय परिसरातील २२२ गणेश मंडळांविरोधात ध्वनिप्रदूषणाच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. गणेश मंडळांच्या आवारात १०० डेसिबलपेक्षा अधिक आवाज होत असल्याचे पोलीस तपासणीत निष्पन्न झाले. याबाबत, दोषी आढळणाऱ्यांना ५ वर्षांचा कारावास व एक लाख रुपये दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. दुसरीकडे त्या मंडळांना नोटीस बजावल्यानंतर उत्तर देण्यासाठी ६० दिवसांची मुदत मिळणार आहे.
ध्वनिप्रदूषणाविरोधात ठाणे शहर पोलिसांनी विशेष खबरदारी घेऊन ते मोजण्यासाठी २७ ध्वनिमापक मशीन सज्ज ठेवल्या होत्या. तसेच प्रत्येक स्थानिक पोलीस ठाण्याच्या स्तरावर त्याबाबत विशेष पथके तयार केली होती. त्यांच्याद्वारे गणेशोत्सव मंडळांच्या ठिकाणी उत्सवापूर्वी आणि उत्सवादरम्यान होणाऱ्या आवाजाची वेगवेगळ्या वेळेत तपासणी करण्यात आली. त्यानुसार, पोलीस ठाण्यांच्या स्तरावर पंचनामे केले आहेत. याबाबत, अहवाल सहायक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत तयार करण्यात येणार आहे. तो अहवाल न्यायालयात सादर केला जाणार आहे. तत्पूर्वी या मंडळांना सहायक पोलीस आयुक्तांद्वारे नोटिसा बजावण्यात येणार असून त्या मंडळांना ६० दिवसांत आपले म्हणणे मांडण्याची मुदत मिळणार आहे. सहायक पोलीस आयुक्तांनी न्यायालयात सादर केलेल्या अहवालावर न्यायालयाच्या आदेशानुसार मंडळांवर गुन्हे दाखल केले जातील. (प्रतिनिधी)

Web Title: Notices to Ganesh Mandals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.