Join us

राज्यातील अडीच हजार हॉटेल्सना बजावली नोटीस, अन्न खाण्यास असुरक्षित

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2018 6:14 AM

स्वयंपाकगृहासह अन्य सेवांचा दर्जा सुधारण्याचे आदेश : ७४ टक्के हॉटेल्स-रेस्टॉरंटमध्ये तयार होणारे अन्न खाण्यास असुरक्षित

मुंबई : राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने नुकत्याच केलेल्या पाहणीत राज्यातील पंचतारांकित हॉटेल्स आणि रेस्टॉरंटचे धक्कादायक वास्तव उघडकीस आणले आहे. या पाहणीत नामांकित पंचतारांकित हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समध्ये स्वयंपाकगृहात मूलभूत स्वच्छता, अन्नसेवेचा दर्जा घसरल्याचे दिसून आले आहे. या पाहणीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील तब्बल २ हजार ६०० पंचतारांकित हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सना स्वयंपाकगृहाच्या स्वच्छतेपासून अन्य सेवांचा दर्जा सुधारण्याविषयी आदेश देण्यात आले आहेत.

अन्न व औषध प्रशासन विभागाने केलेल्या या पाहणीनुसार, ७४ टक्के हॉटेल्स-रेस्टॉरंटमध्ये तयार होणारे अन्न हे खाण्यास असुरक्षित असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यात मोहिमेत एफडीएने शहर-उपनगरातील ४४२ रेस्टॉरंट्स-हॉटेल्सची तपासणी केली असता, त्यातील ३२७ रेस्टॉरंट्स-हॉटेलमधील किचन अस्वच्छ आढळल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांनी दिली. अनेक हॉटेल्समध्ये अन्नाच्या सुरक्षेबाबतचे कोणतेही नियम पाळले जात नसल्याच्या तक्रारी येत असतात. अशा सर्व तक्रारींवर आता प्रशासनाने करडी नजर ठेवली असून त्यांच्यावर कारवाईचा बडगा उभारण्यात येत आहे. याविषयी दराडे यांनी सांगितले की, या पाहणीत ग्राहकांच्या जिवाशी सर्रास खेळ सुरू असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे बड्या पंचतारांकित रेस्टॉ-हॉटेल्सवर या माध्यमातून कडक कारवाई करण्यात आली आहे. या प्रक्रियेचा प्राथमिक टप्प्यात सुधारणा नोटीस पाठविण्यात आली आहे. ही नोटीस पाठवूनही जर त्यांनी योग्य अंमलबजावणी न केल्यास या बड्या रेस्टॉरंट-हॉटेल्सचा परवाना रद्द किंवा निलंबित करण्यात येणार आहे.ग्राहकांनी सतर्क राहावेअन्नसुरक्षा मानके कायद्यानुसार रस्त्यावरील ठेल्यासह पंचतारांकित हॉटेलमध्ये सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. त्यातही स्वच्छ जागी अन्नपदार्थ शिजवावेत आणि ग्राहकांना सादर करावेत, हे अत्यंत महत्त्वाचे असते, पण अनेक रेस्टॉरंट्स-हॉटेल मालकांकडून याचे उल्लंघन करण्यात येते. मात्र, याची जबाबदारी जितकी हॉटेल मालकांची आहे, तितकीच ग्राहकांचीही आहे. त्यांनीही याविषयी सतर्क राहून अन्नाचा दर्जा आणि सेवांविषयी व्यवस्थापनाकडे तक्रार करणे गरजेचे आहे.

टॅग्स :हॉटेलमुंबई