Join us

मुंबईतील १७ मॉल्सना बजावल्या नोटिसा, मालाडमधील मॉल असुरक्षित घोषित

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2024 10:33 AM

मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अमित सैनी आणि उपायुक्त प्रशांत गायकवाड यांनी मुंबई अग्निशमन दलास महापालिका हद्दीतील मॉल्सची तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

मुंबई : पालिकेच्या मुंबई अग्निशमन दलाने २६ ते ३० मे या कालावधीत मुंबईतील ६८ मॉलची अचानक तपासणी केली. या तपासणीत अग्निसुरक्षा नियमांचे पालन न करणाऱ्या १७ मॉल व्यवस्थापनांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. नोटीस बजावलेल्यांपैकी एक असलेल्या मालाड पश्चिम येथील मॉलमध्ये सोमवारी ३ जून रोजी आग लागली. याची गंभीर दखल घेत अग्निशमन दलाने हा मॉल असुरक्षित घोषित करून कायदेशीर कार्यवाही सुरू केली आहे. 

मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अमित सैनी आणि उपायुक्त प्रशांत गायकवाड यांनी मुंबई अग्निशमन दलास महापालिका हद्दीतील मॉल्सची तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार मुंबई अग्निशमन दलाच्या विशेष पथकाने ६८ मॉलची तपासणी केली. या मॉल्सपैकी ४८ मॉलमध्ये अग्निप्रतिबंधक उपाययोजनांची व सुरक्षेची पूर्तता करण्यात आल्याचे पथकाच्या निदर्शनास आले, तर १७ मॉल व्यवस्थापनांनी अग्निसुरक्षा नियमांचे पालन केले नसल्याचे आढळले. त्यामुळे या १७ मॉल्सला महाराष्ट्र अग्निबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना २००६ अन्वये नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तसेच या ३० दिवसांत आढळलेल्या त्रुटींची पूर्तता करण्यासाठी सांगण्यात आले आहे. 

‘मेसर्स द मॉल’ या मॉलला मागील आठवड्यात आढळून आलेल्या त्रुटींची पूर्तता करण्याबाबत नोटीस बजावण्यात आली होती. सोमवारी याच मॉलमध्ये आगीची दुर्घटना घडली.‘मेसर्स द मॉल’ या मॉलला मागील आठवड्यात आढळून आलेल्या त्रुटींची पूर्तता करण्याबाबत नोटीस बजावण्यात आली होती. मालाड पोलिस ठाण्यामार्फत हा मॉल रिकामा करण्यास व अभियोग दाखल करून सदर प्रकरण न्यायप्रविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.- संतोष सावंत, प्रमुख अग्निशमन अधिकारी (प्रभारी)

टॅग्स :मुंबई