पनवेल : पनवेलमधील जुन्या तलाठी कार्यालयातील अनेक महत्त्वाची कागदपत्रे, दस्तावेज, ओळखपत्रे ेवाऱ्यावर पडल्याचे वृत्त लोकमतमध्ये शनिवारी प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची पनवेलच्या तहसीलदारांनी गंभीर दखल घेत संबंधित पदनिर्देशित अधिकाऱ्यांना नोटिसा बजावून जाब विचारला आहे. तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी जागेचा पंचनामाही केला, मात्र दस्तावेज त्याच स्थितीत ठेवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.तलाठ्यांना मतदार ओळखपत्र वितरित करण्याचा अधिकार नसतानाही ही ओळखपत्रे तलाठ्याजवळ कशी, संबंधित मतदार ओळखपत्र मतदार यादी क्र मांक २३१ व २४१ मधील आहेत. हे वितरित करण्याची जबाबदारी असलेल्या पदनिर्देशित अधिकाऱ्यांनी ती का वितरित केली नाहीत. यासंदर्भात कारणे दाखवा नोटीस तहसीलदार दीपक आकडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बजावली आहे. तसेच केलेल्या पंचनाम्याच्या आधारे काही बाबी समोर आल्यानंतर दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे आकडे यांनी सांगितले. मात्र अशाप्रकारचा गंभीर प्रकार उघडकीस आल्यानंतरही प्रशासनाचा हलगर्जीपणा सुरूच आहे. जुन्या तलाठी कार्यालयातील सर्व दस्तावेज त्याच परिस्थितीत कार्यालयात पडलेला आहे. खबरदारी म्हणून तहसील कार्यालयाच्या वतीने याठिकाणी कोणत्याच उपाययोजना राबविण्यात आल्या नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात शिवसेना आक्र मक झाली आहे. पनवेल नगरपरिषदेचे नगरसेवक रमेश गुडेकर यांनी कार्यालयाची पाहणी करून तहसीलदारांना जाब विचारणार असल्याचे त्यांनी सांगितले. पनवेलमधील या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. (प्रतिनिधी)
प्रशासकीय दस्तावेजप्रकरणी अधिकाऱ्यांना नोटिसा
By admin | Published: June 27, 2015 10:52 PM