‘एटीएम’मधून खेळण्याच्या नोटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 07:09 AM2017-09-15T07:09:07+5:302017-09-15T07:09:30+5:30
नोटाबंदीनंतर पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नव्या नोटांवर शाईचा डाग असला तरी त्या स्वीकारल्या जात नाहीत. अशात एका नामांकित बँकेच्या एटीएममधून पोलीस पत्नीच्या हाती चक्क खेळण्याच्या नोटा लागल्याने खळबळ उडाली. पोलीस पत्नी असल्याने संबंधित बँकेने तक्रारीनंतर गुरुवारी त्यांना पैसे परत केले.
मुंबई : नोटाबंदीनंतर पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नव्या नोटांवर शाईचा डाग असला तरी त्या स्वीकारल्या जात नाहीत. अशात एका नामांकित बँकेच्या एटीएममधून पोलीस पत्नीच्या हाती चक्क खेळण्याच्या नोटा लागल्याने खळबळ उडाली. पोलीस पत्नी असल्याने संबंधित बँकेने तक्रारीनंतर गुरुवारी त्यांना पैसे परत केले. मात्र या घटनेत जर सामान्य नागरिक अडकला असता तर, त्याच्या डोकेदुखीत आणखी भर पडली असती.
मुंबई गुन्हे शाखेत पोलीस शिपाई म्हणून कार्यरत असलेल्या एका शिपायाच्या पत्नीसोबत हा प्रकार घडला. त्या बदलापूरला राहण्यास आहेत. ७ सप्टेंबर रोजी विमानतळावरून येताना त्या घाटकोपर मेट्रो स्थानकात उतरल्या. तेथील एका एटीएममधून त्यांनी पाच हजार रुपये काढले. या वेळी दोन हजार आणि पाचशेच्या प्रत्येकी दोन नोटा त्यांना एटीएममधून मिळाल्या.
त्यांनी घाईतच या नोटा घेत घर गाठले. औषधांसाठी ते पैसे सासूंकडे दिले. दुसºया दिवशी त्याच नोटा घेऊन मेडिकलमध्ये गेलेल्या सासूला तेथील कर्मचाºयांनी नोट खोटी असल्याचे सांगितले. त्यांनी याबाबत सुनेला कळविले. घरी येऊन नोट पाहिली तर त्या खेळण्यातल्या नोटा असल्याचे लक्षात आले. त्यांनी याबाबत संबंधित बँकेच्या कर्मचाºयांकडे विचारणा केली. त्यानंतर पोलीस शिपायाने वरिष्ठांच्या मदतीने बँकेकडे तक्रार दिली. त्या तक्रारीवरून गुरुवारी बँकेने त्यातील काही रक्कम पोलीस पत्नीला देऊ केली.