१५ सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना नोटिसा; आयकर विभागाची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2023 07:39 AM2023-07-04T07:39:13+5:302023-07-04T07:39:23+5:30
उपलब्ध माहितीनुसार, काही प्रमुख सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सनी अलीकडच्या काळात आलिशान परदेशी दौरे केले.
मुंबई : सोशल मीडियामध्ये इन्फ्लुएन्सर म्हणून लौकिक कमावत भक्कम पैसा कमावलेल्या मात्र त्यावर उचित करभरणा न केलेल्या १५ सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना आयकर विभागाने नोटिसा जारी केल्या आहेत. याखेरीज मुंबईतील आणखी ३० सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सच्या कर विवरणाचीही (आयटीआर) आयकर विभागातर्फे तपासणी सुरू असून तेही रडारवर आहेत.
उपलब्ध माहितीनुसार, काही प्रमुख सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सनी अलीकडच्या काळात आलिशान परदेशी दौरे केले. त्याच दरम्यान त्यांच्या आयकर विवरणाची तपासणी सुरू होती. मात्र, त्यांनी त्यांचे वार्षिक उत्पन्न जेमतेम साडे तीन ते चार लाखांच्या दरम्यान दाखवले होते. त्यामुळे उत्पन्न व खर्च यांचा मेळ बसत नसल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या परदेशी दौऱ्याच्या खर्चाची माहिती मागविण्यात आल्याचे समजते. विशेष म्हणजे, या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सनी ज्या कंपन्यांच्या ब्रॅण्डचे प्रमोशन केले आहे त्या कंपन्यांनी या इन्फ्लुएन्सर्ससोबत केलेल्या आर्थिक व्यवहारांची माहिती तपासली असता त्यांना या कंपन्यांनी ३० लाख रुपयांपर्यंत मानधन दिल्याचे दिसून आले. यामुळे उत्पन्न दडविल्याचाही ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
जीएसटी नोंदणी नाही
व्यावसायिक तत्त्वावर काम करणाऱ्या व्यक्तीचे उत्पन्न वर्षाला २० लाख रुपयांपेक्षा जास्त असले तर त्याला जीएसटीसाठी नोंदणी करावी लागते व नोंदणी क्रमांक प्राप्त करून संबंधित आर्थिक उलाढालीवर जीएसटी भरावा लागतो. मात्र, या प्रकरणात काही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सनी जीएसटीची नोंदणीही केली नसल्याचे समजते. त्यामुळे अप्रत्यक्ष कर विभागही आता त्यांची चौकशी करणार आहे.