मुंबई: एकीकडे मुंबईत पालिकेकडून स्वच्छता मोहीम हाती घेतलेली असताना दुसरीकडे मुंबईत जागोजागी, मोक्याच्या ठिकाणी पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग्ज लावून मुंबईचे होणारे विद्रुपीकरण सातत्याने सुरु आहे. दरम्यान यातील अनेक पोस्टर्स, बॅनर्स आणि होर्डिंग्ज हे पालिकेची परवानगी न घेता लावलेले असतात. त्यामुळे यापुढे असे अनधिकृत फलक लावणाऱ्यांसह ते छपाई करून देणाऱ्या प्रिंटर्स व्यावसायिकांनाही नोटीस बजावण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी दिल्या आहेत. शुक्रवारी अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी मुंबईतील अतिक्रमण निर्मूलन कार्यवाहीचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी अधिकार्यां अय सूचना केल्या.
मुंबईत अनधिकृतपणे होर्डिंग लावण्यावर निर्बंध आहेत. त्यानंतरही जागोजागी मोठे होर्डिंग लावून मोकळ्या जागा व्यापल्या जात आहेत. राजकीय पुढाऱ्यांचे वाढदिवस, सभा, मोर्चे, यासह विविध धार्मिक कार्यक्रमांच्या जाहिरातींमुळे अवैध बॅनर, बोर्ड, होर्डिंगची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. यातील बहुतांश होर्डिंग अवैध असल्याच्या तक्रारी पालिकेकडे नोंद होत असून, तक्रारीनंतर पालिकेकडून होर्डिंग काढले जातात. मात्र त्यानंतरही नियम धाब्यावर बसवून होर्डिंग लावून मुंबई विद्रूप करण्याचे प्रकार सुरूच आहेत.
त्यामुळे मुंबईतून राडारोडा, कचऱ्याची स्वच्छता केली तरी पोस्टर्स, होर्डिंगमुळे मुंबईला येणाऱ्या बकालपणामुळे स्वच्छ मुंबई झाकोळली जाते. त्यामुळे स्वच्छतेच्या उपाययोजना राबवताना पालिका क्षेत्रातील सर्व अनधिकृत होर्डिंग्ज, बॅनर, पोस्टर्सवर निष्कासन कारवाई करावी आणि अनधिकृत फलकांवर कारवाईसाठी कायमस्वरूपी पथक नेमण्याच्या सूचना आयुक्त डॉ इकबाल सिंह चहल यांनी दिल्या होत्या. याचाच एक भाग म्हणून अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी आढावा बैठकीत पालिका हद्दीतील अनधिकृत फलक, बॅनर्स, बेवारस वाहने, पदपथावरील अतिक्रमण आदींबाबत कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. पोलिसांची मदत घेण्याच्या सूचनाहोर्डिंग्ज , पोस्टर प्रमाणे पालिका हद्दीत आढळून येणारी बेवारस व भंगार वाहने हटविण्याची कारवाई करावी आणि पदपथांवरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम सतत सुरू असते मात्र यापुढे या कारवाईला वेग देण्यात यावा, त्यासाठी प्रसंगी पोलिसांची मदत घेण्याच्या सूचना जोशी यांनी दिल्या आहेत. दरम्यान सर्व कारवाई करताना महानगरपालिकेच्या सर्व प्रभाग कार्यालयांतील तसेच विविध खात्यांनी एकत्रितपणे व समन्वयाने मोहीम राबवावी असे तयांनी स्पष्ट केले आहे. या कारवाईत सहभागी असणाऱ्या सर्व संबंधित विभागांनी दररोज जी कारवाई केली, त्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना अहवाल सादर करावा असे ही त्यांनी स्पष्ट केले आहे. कारवाईला वेग येणारपालिका प्रशासनाकडून सप्टेंबरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सूचनांनंतर आयुक्तांनी पालिका अधिकाऱ्यांना सर्व अनधिकृत बॅनर्स, पोस्टर्स, होर्डिंग्ज हटविण्यासाठी विशेष मोहीम घेण्याच्या सूचना दिली होत्या. त्यानुसार ८ दिवसांत ९ हजार ३३८ पोस्टर्स, बॅनर्स, झेंडे व हार्डिंग्जवर कारवाई करण्यात आली. मात्र त्यानंतर ही कारवाई पुन्हा थंडावली असल्याने अनधिकृत बॅनरबाजी पुन्हा वाढली. आता अतिरिक्त आयुक्तांच्या सूचनेनंतर या कारवाईला पुन्हा वेग येईल अशी अपेक्षा व्यक्त केल जात आहे.