२०२१-२२ आर्थिक वर्षातील शेकडो करदात्यांना नोटिसा
By मनोज गडनीस | Published: March 5, 2024 06:28 PM2024-03-05T18:28:38+5:302024-03-05T18:28:44+5:30
- उत्पन्न व खर्चात तफावत, आयकर विभागाने जारी केल्या नोटिसा
मुंबई - आर्थिक वर्ष २०२१-२२ या वर्षासाठी ज्यांनी आयकराचे विवरण दाखल केले आहे आणि ज्यांनी विवरणात दिलेली माहिती व प्रत्यक्षात केलेले व्यवहार यामध्ये विसंगती आढळली आहे, अशा शेकडो करदात्यांना आयकर विभागाने नोटिसा जारी केल्या आहेत. ई-मेलद्वारे या नोटिसा जारी करण्यात आल्याची माहिती आहे.
गेल्या काही वर्षात आयकर विभागासह विविध विभागांचे संगणकीकरण झाले आहे. तसेच मोठ्या आर्थिक व्यवहारांमध्ये पॅन कार्डाचा क्रमांक नमूद करण्याची सक्ती करदात्यांवर आहे. यामुळे संबंधित करदात्यांनी केलेल्या सर्व आर्थिक व्यवहारांची माहिती आयकर विभागाला एका क्लिकवर प्राप्त होते. २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी ज्यांनी आयकराचे विवरण दाखल केले व त्यात जी माहिती जाहीर केलेली नाही, अशाही माहितीचे तपशील आयकर विभागाकडे उपलब्ध आहेत. अशाच व्यवहारांची पडताळणी करत आयकर विभागाने या नोटिसा जारी करण्यास सुरुवात केली आहे. अशा करदात्यांनी ३१ मार्च २०२४ पर्यंत आपले सुधारित विवरण दाखल करत व अनुषंगिक करभरणा करण्यास सांगण्यात आले आहे.