नोटीस नव्हे उपाहारगृहांना थेट सील ठोकणार, आयुक्तांनी ठणकावले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2018 09:32 PM2018-01-05T21:32:20+5:302018-01-05T21:34:34+5:30
लोअर परळ येथील कमला मिल कंपाऊंडमधील आगीच्या दुर्घटनेत आयुक्त अजोय मेहता यांच्यावरही आरोप होत असल्याने अखेर त्यांनी आज आपले मौन सोडले.अविश्वास कसला दाखविता कारवाईला पाठिंबा द्या, असे नगरसेवकांना सुनावले.
मुंबई- लोअर परळ येथील कमला मिल आग दुर्घटनेत आयुक्त अजोय मेहता यांच्यावरही आरोप होत असल्याने अखेर त्यांनी आज आपले मौन सोडले.अविश्वास कसला दाखविता कारवाईला पाठिंबा द्या, असे नगरसेवकांना सुनावले. तसेच सोमवारपासून मुंबईतील सर्व उपाहारगृहांची झाडाझडती घेऊन कारवाईला सुरुवात करणार असल्याचे स्पष्ट केले. बेकायदा बांधकाम किंवा आग प्रतिबंधक नियम मोडणा-या उपाहारगृहांना नोटीस नाही, तर थेट टाळेच ठोकणार असल्याचे त्यांनी पालिका महासभेत आज जाहीर केले.
कमला मिल कंपाऊंडच्या आगीमधील मोजो बिस्ट्रो व वन अबव्ह रेस्टो पबला लागलेल्या आगीत 14 जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणात जी दक्षिण विभागातील पाच अधिका-यांना निलंबित करण्यात आले. मात्र विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळे यांची केवळ बदली करून त्यांना आयुक्तांनी अभय दिल्याचे आरोप होत आहे. या रेस्टॉरंटला आयुक्तांच्या स्तरावरही परवानगी मिळाल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे आयुक्तांच्या कारभारावर अविश्वास दाखवित त्यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याची तयारी विरोधी पक्षाने केली.
पालिका महासभेत सर्वच पक्षीयांनी निशाणा केल्यानंतर निवेदन करताना आयुक्तांनी परवापासून सर्व उपाहारगृहांची तपासणी सुरू होणार असल्याचे सांगितले. कमला मिल आगीच्या दुर्घटनेत कोणालाही क्लीन चिट देणार नाही. अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी महिन्याभरात चौकशीचा अहवाल सादर केल्यानंतर या अधिका-यांवर कठोर कारवाई होईल. मात्र यापुढे नियम मोडणा-या उपाहारगृहांना नोटीस नव्हे तर पोलिसांना बोलावून थेट सील ठोकण्यात येईल. त्यानंतर आवश्यक त्या दुरुस्तीसाठी संबंधित उपाहारगृहांना मुदत देण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.
दोन दिवसांत 670 बांधकाम पाडले
या दुर्घटनेनंतर महापालिकेने दुस-याच दिवशीपासून उपाहारगृहांची तपासणी करीत तब्बल ६७० अनधिकृत बांधकामं तोडण्यात आली. ही कारवाई अशीही पुढे सुरूच राहणार असल्याची ग्वाही आयुक्तांनी दिली.
कायद्याचे बोला
महासभेत 40 हून अधिक नगरसेवकांनी आयुक्तांना सुचना केल्या. मात्र निवेदन करताना आयुक्तांनी एेकीन सगळ्यांचे पण करीन कायद्याचे असे ठणकावून सांगितले.
अग्निशमन विभागाचे विभाजन ?
मुंबईच्या लोकसंख्येपुढे तोकडी पडणारी अग्निशमन दलाची ताकद वाढविण्याची मागणी अनेक वेळा झाली. मात्र यावर आयुक्तांनी पहिल्यांदाच विभाजनाचा प्रस्ताव अप्रत्यक्ष मांडला. अशा दुर्घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी काय काय करता येईल त्या संदर्भात सर्व अधिका-यांशी चर्चा केली. त्यानुसार अग्निशमन यंत्रणांमध्ये सुधारणेची गरज आहे. मात्र आग विझवणारे आणि परवानगी देणारी वेगवेगळी यंत्रणा असणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
गच्चीवर रेस्टॉरंटचे समर्थन
वन अबव्ह व मोजो बिस्ट्रो हे दोन्ही गच्चीवरील रेस्टो पब होते. त्यामुळे गच्चीवर रेस्टॉरेंटचे धोरण मंजूर केल्यावर नगरसेवकांनी आक्षेप घेतला. मात्र आपल्या निर्णयावर ठाम राहत आयुक्तांनी या धोरणाचे समर्थन केले. या रेस्टॉरेंटमध्ये अन्न शिजविण्यास प्रतिबंध करणार हे त्यांनी आवर्जून सांगितले.