मुंबई : राज्यभर पहिली ते दहावीपर्यंतच्या शाळांतील विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन हजेरीला १ डिसेंबरपासून सुरुवात झाली असली तरी मुंबईतीलशाळांना यासंदर्भात कुठल्याही सूचना मिळालेल्या नाहीत. त्यामुळे आठवडा उलटून गेला तरी मुंबईत ऑनलाइन हजेरी सुरू झालेली नाही. आदेशाच्या प्रतीक्षेत शिक्षक आहेत.
गुजरातच्या धर्तीवर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी अनुदानित आणि अंशत: अनुदानित शाळांमधील पहिली ते दहावीतील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची दररोज ऑनलाइन नोंद केली जाणार आहे. त्यासाठी स्विफ्टचॅट या ॲपची निर्मिती करण्यात आली आहे. राज्यभर १ डिसेंबरपासून पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन हजेरीला सुरुवात झाली आहे.
जवळपास १६०० शाळांमध्ये ही हजेरी लागणार आहे, मात्र शाळांना कोणत्याही सूचना न मिळाल्याने ऑनलाइन हजेरी सुरू झालेली नाही. राज्यभर विद्यार्थ्यांची ऑनलाइन हजेरी लावताना शिक्षकांना तांत्रिक अडचणी येत आहेत. मात्र कोणत्याच सूचना न मिळाल्याने अजून तरी शिक्षक जात्यात आहेत, अशी प्रतिक्रिया एका शिक्षकाने दिली, तर काही शिक्षकांनी ऑनलाइन हजेरीबाबत सहकार्याची भूमिका घेतली आहे.
सध्या माध्यान्ह भोजनासाठी आम्ही विद्यार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी दररोज करत असतो. त्यामुळे ऑनलाइन हजेरीला विरोध करण्याचे कारण नाही.- माधव सूर्यवंशी, शिक्षक
राज्यभर शाळांमधील विद्यार्थ्यांची ऑनलाइन हजेरी लावण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. हे काम सुरू झाले आहे. लवकरच याचा आढावा घेतला जाईल - प्रमोदकुमार डांगे, संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद
नोंद कशी करायची?
पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती वर्गशिक्षकांनी स्विफ्टचॅट ॲप डाऊनलोड करून नोंदवायची आहे. त्यातील अटेंडन्स बॉटद्वारे नोंदणी करता येईल. मुंबईतील पालिका, अनुदानित, खासगी अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांची नोंदणी याद्वारे करायची आहे. विद्या समीक्षा केंद्रांद्वारे हजेरीची नोंद ठेवली जाईल. महाराष्ट्रात हे केंद्र पुण्यात असेल.