Join us

अधिसूचना प्रसिद्धीने निवडणूक प्रक्रिया सुरु

By admin | Published: September 21, 2014 1:50 AM

महाराष्ट्राची 12 वी विधानसभा निवडण्यासाठी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी अधिसूचना प्रसिद्ध केल्याने राज्यातील 288 मतदारसंघांमध्ये निवडणूक प्रक्रिया शनिवारपासून सुरु झाली.

मुंबई: महाराष्ट्राची 12 वी विधानसभा निवडण्यासाठी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी अधिसूचना प्रसिद्ध केल्याने राज्यातील 288 मतदारसंघांमध्ये निवडणूक प्रक्रिया शनिवारपासून सुरु झाली. 
ज्येष्ठ भाजपा नेते व केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या बीड लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रक्रियाही शनिवारपासून सुरु झाली. विधानसभा व लोकसभा पोटनिवडणुकीचे मतदान 15 ऑक्टोबर रोजी व्हायचे आहे.
उमेदवारी अर्ज स्वीकरण्यासही शनिवारपासून सुरुवात झाली. परंतु पितृपक्षामुळे राज्यात पहिल्या दिवशी एकाही राजकीय पक्षाच्या उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही. पहिल्या दिवशी आर्वी आणि भंडारा मतदारसंघांमध्ये प्रत्येकी एका अपक्ष उमेदवाराने अर्ज भरल्याची माहिती आहे. गडचिरोलीमध्ये पहिल्या दिवशी 67 उमेदवारी अर्जाचे वाटप झाले.
 
मतदानासाठी 11 तास
विधानसभेच्या 288 पैकी 284 मतदारसंघांत 15 ऑक्टोबर रोजी स. 7 ते सा. 6 अशी 11 तासांची वेळ निवडणूक आयोगाने मतदानासाठी जाहीर केली आहे. मात्र विदर्भातील आमगाव, आरमोरी, गडचिरोली आणि अहेरी या चार नक्षलप्रवण मतदारसंघांत मात्र स. 7 ते दु. 3 असे आठ तास मतदान घेण्यात येणार आहे. 
 
दीड हजारांवर अर्ज विक्री
विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज विक्री व दाखल करण्याची प्रक्रिया शनिवारपासून सुरू झाली. पहिल्याच दिवशी सुमारे 1689 अर्जाची विक्री झाली. यापैकी विदर्भात पाच तर उर्वरित महाराष्ट्रात 4 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.